व्हिक्टोरिया राणीला छत्र मिळणार का ?
By admin | Published: June 13, 2017 02:47 PM2017-06-13T14:47:28+5:302017-06-13T14:48:03+5:30
एकेकाळी अर्ध्याहून अधिक जगावर राज्य करणाऱ्या व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याला छत्र मिळणार का?
ओंकार करंबेळकर / ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि.13: स्वातंत्र्यानंतर भारतात विशेषतः मुंबई, चेन्नईसारख्या शहरांमध्ये इंग्रजांच्या वसाहतीच्या खुणा पुसण्यासाठी विशेष मोहीमच हाती घेण्यात आली. रस्त्यांची, चौकांची नावे बदलणे, जुन्या पुतळ्यांच्या जागी भारतीय नेत्यांचे पुतळे उभे करणे, इंग्रजांचे पुतळे हटवणे अशा प्रकारे वसाहतावादाची चिन्हे बदलण्यात आली. मुंबईमध्येही अनेक पुतळ्यांना आपल्या मूळ जागेवरून हटावे लागले. यातील अनेक पुतळे राणीच्या बागेत ठेवण्यात आले आहेत. महाराणी व्हिक्टोरियाच्या पुतळ्याचाही यामध्ये समावेश आहे. मात्र या संगमरवरी पुतळ्याचे छत्र मुंबईतच दुसऱ्या जागेवर ठेवण्यात आले आहे.
1872 साली बडोद्याचे राजे गायकवाड यांनी व्हिक्टोरिया राणीचा संगमरवरी पुतळा मुंबईमध्ये स्थापन करण्यासाठी दिला. अलेक्झांड्रा शाळेजवळच्या चौकामध्ये (सध्या हजारीमल सोमाणी रस्ता आणि महात्मा गांधी रस्ता) येथे ठेवण्यात आलेला हा पुतळा जागतिक दर्जाचे शिल्पकार मॅथ्यू नोबल यांनी करारा मार्बलमध्ये घडवला होता. जून 1872मध्ये मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर फिलिप एडमंड वोडहाऊस यांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात आले होते. या पुतळ्याचे छत्र सिसिलियन मार्बलमध्ये तर छताचे खांब आणि मागची बाजू सिएना मार्बलमध्ये तयार करण्यात आले. राणीच्या एका हातात राजदंड आणि दुसऱ्या हातात पृथ्वीगोल ठेवण्यात आली आहे. सगळ्या जगावर (त्या काळात) ब्रिटीश सत्ता असल्याचे ते प्रतिक होते.
1896 साली मुंबई प्रांतात प्लेग पसरल्यानंतर त्याला आवरण्यासाठी अत्यंत अघोरी उपाययोजना इंग्रजांनी सुरु केल्या. या उपाययोजनांच्या नावाखाली चाललेल्या अत्याचारांची चीड चापेकर बंधुंच्या मनामध्ये होती. अत्याचांरांचा निषेध करण्यासाठी चापेकर बंधुंनी या पुतळ्याचे नाक कापून पुतळ्याच्या तोंडावर डांबर फासले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा पुतळा उचलून राणीच्या बागेत ठेवण्यात आला तर त्याचे छत्र उद्योगपती सिंघानिया यांनी विकत घेतले. पुतळा ज्या चौकामध्ये होता त्याला आता चापेकर बंधुंचे नाव देण्यात आले आहे.
गेली अनेक वर्षे हा पुतळा राणीच्या बागेत (जिजामाता उद्यान) इतर पुतळ्यांसोबत ठेवला आहे. तर साधारण पंचवीस फुटांचे तिचे छत्र भुलाभाई देसाई रस्त्यावर कापडाच्या शोरुमसमोर ठेवण्यात आले आहे. अत्यंत सुबक असे कोरीवकाम असलेला पुतळा आणि त्याचे छत्र पुन्हा एकत्र पाहायला मिळणार का असा प्रश्न मुंबईतील इतिहास अभ्यासक विचारत आहेत. एकेकाळी बहुतांश पृथ्वीवर राज्य करणाऱ्या व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्यावर मात्र छत्र नसल्याची स्थिती निर्माण आहे.
पुतळ्यांचे संवर्धन जुन्याच रुपात व्हावे- भरत गोठोस्कर, नागरी इतिहासाचे अभ्यासक
व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्यासारखे पुतळे त्यांच्या मूळ स्वरुपात ठेवले जावेत. बहुतांश पुतळ्यांचे कोरीवकाम केलेले चबुतरे नष्ट झाले आहेत. हा पुतळाही त्याच्या छत्रासह ठेवला गेला पाहिजे. इंग्रजांनी त्यांच्या सत्तेच्या काळामध्ये हे पुतळे उभे केले असले तरी आज त्याच्याकडे कला म्हणून पाहिले जाऊ शकते. मुंबईत काही पुतळे काही संस्थांच्या इमारतींमध्ये ठेवण्यात आले होते, ते पुतळे आज सुस्थितीत आहेत. सायन्स इन्स्टिट्यूटमधील सिडनहॅमचा पुतळा, एशियाटिक ग्रंथालयातील माल्कम, एलफिन्स्टन, फ्रिअरे यांचे पुतळे इमारतींच्या आत असल्यामुळे चांगल्या स्थितीत आहेत.