लोकलची गर्दी कमी करणार, ट्रेन वेळेत चालवणार; प्रवासी संघटनांना आश्वासन
By सचिन लुंगसे | Published: June 19, 2024 07:00 PM2024-06-19T19:00:03+5:302024-06-19T19:00:24+5:30
महाव्यवस्थापकांनीही समस्या समजावून घेत त्या सोडविण्यावर भर दिला जाईल, असे आश्वासन दिल्याचे नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.
मुंबई - मुंबई महानगराला जोडणा-या लोकलची गर्दी कमी करण्यासाठी विविध स्तरावर उपाय योजना आखल्या जात आहेत. यात ऑफीसच्या वेळा बदलण्यापासून विविध गोष्टींचा समावेश असून, ठाणे आणि सीएसएमटी येथील फलाटांच्या विस्तारीकरणानंतर सुरु करण्यात आलेल्या नव्या यंत्रणेमुळे लोकल वेळेवर धावतील, असा विश्वास मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी व्यक्त केल्याची माहिती रेल्वे प्रवासी संघटनांनी दिली.
मध्य रेल्वेचे तीनतेरा वाजले असून, रेल्वेवरील वाढणा-या अपघातांत रेल्वे प्रवाशांचे बळी जात आहेत. याव्यतीरिक्त लोकल सातत्याने विलंबाने धावत असून, प्रवाशांना लेटमार्क लागत आहे. रेल्वेच्या या सर्व समस्यांवर काय उपाय योजना करता येतील ? या आढावा घेण्यासाठी फेडरेशन ऑफ सबअर्बन रेल्वे यात्री संघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांच्यासह रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी राम करण यादव यांची भेट घेतली. भेटीदरम्यान रेल्वे प्रवाशांच्या व्यथा, वेदना मांडतानाच रेल्वे अपघात कमी करण्यासाठी काय केले जाऊ शकते ? याचा ऊहापोह केला. महाव्यवस्थापकांनीही समस्या समजावून घेत त्या सोडविण्यावर भर दिला जाईल, असे आश्वासन दिल्याचे नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.
टिटवाळा आणि बदलापूरहून १५ डब्यांच्या लोकल सोडण्यात याव्यात. एसी लोकल सुरु करण्यात यावी. एसी लोकलचे भाडे कमी करण्यात यावे. कळवा व मुंब्रा स्टेशनमध्ये सकाळ-संध्याकाळ काही जलद लोकलना थांबा मिळावा. रोहा व पेण येथून सकाळी दिवा स्थानकात येणाऱ्या ३ मेमू गाड्या ७.४५ ते ८.४५, ८.३० ते ९.१० व ९.१० ते ९.४० अशा दीर्घकाळ थांबून मग परतीच्या प्रवासासाठी सुटतात. या कालावधीत या प्रत्येक गाडीच्या दिवा ते ठाणे फलाट ८ व तिसरा काॅरीडाॅर / पारसीक टनेलमधून पुन्हा दिवा अशा ३ फेऱ्या चालवल्यास त्यावेळेस लोकलमधील गर्दी कमी व्हायला मदत होईल. सकाळ / संध्याकाळच्या वेळात ठाणे - डोंबिवली दरम्यान लोकलच्या जास्तीतजास्त शटल फेऱ्या चालवा. बदलापूर / अंबरनाथ / टिटवाळा ते ठाणे ( कल्याण-ठाणे दरम्यान तिसऱ्या काॅरीडाॅरवरून जलद ) लोकल फेऱ्या चालवा, असे उपाय असलेले निवेदन रेल्वेला देण्यात आले आहे.