डोळ्यांतील रेटिना कोरोनाचा धोका करणार कमी; गंभीर आजारांची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 01:55 AM2020-07-21T01:55:44+5:302020-07-21T01:56:01+5:30
केअर सेंटरवर रुग्णांची चाचणी
मुंबई : मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार असे गंभीर आजार असलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या जीवावर बेतू शकते. मात्र अनेक वेळा अशा काही रुग्णांना त्यांना असलेल्या गंभीर आजारांबाबत माहिती नसते. परंतु, अशा गंभीर आजारांची माहिती डोळ्यांतील रेटिनाच्या तपासणीद्वारे देणारी चाचणी महापालिकेने आपल्या काही कोरोना केंद्रातील संशयित रुग्णांवर केली आहे.
मुंबईत आतापर्यंत सुमारे एक लाख दोन हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर पाच हजार ७५२ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचे आजार, कर्करोग असे आजार असणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. या आजाराची माहिती नसलेल्या व्यक्तीला कोरोना झाल्यास आणि त्याने आवश्यक उपचार न घेतल्यास त्याच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे असे आजार असणाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेणे आवश्यक असते.
मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेने कोरोनाचा धोका अधिक असलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांना तातडीने उपचार देण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून प्राणवायूचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असलेल्या ६० वर्षांवरील व्यक्तीवर उपचार केले जात आहेत. त्याचप्रमाणे आता इतर आजार असल्यास त्याची माहिती मिळून वेगाने कार्यवाही करता यावी, यासाठी रेटिना टेस्ट विभाग कार्यालयांमध्ये करण्यात येत आहेत.
माटुंगा, वडाळामध्ये चाचणी
पालिकेच्या एफ उत्तर म्हणजेच माटुंगा, वडाळा, शीव परिसरात मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येत आहेत. यामध्ये आतापर्यंत बेंगालीपुरा- ८७, अॅक्वॉर्थ लेप्रसी- १९, वडाळा स्कूल- ११, मिठागर स्कूल-२२ आणि सोमय्या हॉस्पिटल सेंटर- ४५ अशा एकूण १८४ टेस्ट करण्यात आल्याची माहिती ‘एफ उत्तर’चे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळ यांनी सांगितले. यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह, बाधित रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी केली जात आहे. यामुळे कोरोनाचा धोका सर्वाधिक असलेल्या रुग्णांमधील इतर दीर्घ आजारांची माहिती वेगाने मिळून तातडीने उपचार करणे, खबरदारी घेणे शक्य होणार आहे. परिणामी, जीवितहानीचा धोका टळणार आहे.