मुंबई : पालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कर ६७ जणांनी वर्षानुवर्षे थकविला असून, हा थकीत करवसूल करण्यासाठी पालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे. एकूण ३५५ कोटी १९ लाख रुपयांची रक्कम थकीत असून, या रकमेच्या वसुलीसाठी ६७ थकबाकीदारांच्या इतर स्थावर मालमत्ता व गुंतवणुकीचा शोध पालिकेकडून घेण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने व्यावसायिक संस्थेची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
मालमत्ता कर हा बृहन्मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मालमत्ता कर देयके मिळाल्यापासून ९० दिवसांच्या आत मालमत्ता कर महानगरपालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. या कालावधीत कर न भरल्यास पालिकेकडून टप्पेनिहाय कारवाई करण्यात येते. महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्याचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद साधून मालमत्ता कर भरण्यासाठी पाठपुरावा करतात. तरीही मालमत्ता कर न भरल्यास ‘डिमांड लेटर’ पाठविण्यात येते. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात मालमत्ताधारकास २१ दिवसांची अंतिम नोटीस दिली जाते.
मालमत्ता करवसुलीच्या दृष्टीने थकबाकीदारांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले आहेत. ६७ थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून, या सर्व मालमत्ताधारकांकडे मिळून २६७ कोटी ८८ लाख रुपयांचा मूळ कर, तर ८७ कोटी ३१ लाख रुपयांचा दंड अशी एकूण ३५५ कोटी १९ लाख रुपयांची रक्कम थकीत आहे. मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर सहआयुक्त (कर निर्धारण व संकलन) सुनील धामणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली जाणार आहे.