टीबी आणि कुष्ठरोगी रुग्णांचा शोध घेणार; मुंबई महापालिका ४९ लाख रुग्णांची तपासणी करणार

By संतोष आंधळे | Published: November 17, 2023 09:45 PM2023-11-17T21:45:15+5:302023-11-17T21:45:29+5:30

या मोहिमेदरम्यान नव्याने आढळणाऱ्या कुष्ठ व क्षयरुग्णांची नोंदणी केली जाईल.

will seek TB and leprosy patients; Mumbai Municipal Corporation will examine 49 lakh patients | टीबी आणि कुष्ठरोगी रुग्णांचा शोध घेणार; मुंबई महापालिका ४९ लाख रुग्णांची तपासणी करणार

टीबी आणि कुष्ठरोगी रुग्णांचा शोध घेणार; मुंबई महापालिका ४९ लाख रुग्णांची तपासणी करणार

मुंबई : महानगपालिकेचा आरोग्य विभाग आता घरोघरी जाऊन टी बी ( क्षयरोग ) आणि कुष्ठरोगी रुग्णांचा शोध घेणार आहे. त्यासाठी महापालिकेची संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लागणार असून या विशेष मोहिमेअंतर्गत ४९ लाख रुग्णांची तपासणी करणार आहेत. यासाठी विभागातील १० लाख ८८ हजार घरांना प्रत्यक्ष भेटी देण्यात येणार आहे.  

 विशेष मोहिम २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२३ या कालावधीत राबविण्यात येणार असून त्यासाठी  ३ हजार ११७ पथकांद्वारे घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यावेळी  सक्रिय संयुक्त क्षयरोग शोध मोहीम  आणि कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार आहे.  केंद्र सरकारने दिलेल्या उद्दिष्टानुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सन २०२५ पर्यंत  क्षयरोग दूरीकरणाचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.  तसेच राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सन २०३० पर्यंत कुष्ठरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

काय असणार मोहीम  ? 
या मोहिमेत या आजाराच्या जनजागृतीसाठी घरोघरी आरोग्य तपासणी करुन क्षयरोग व कुष्ठरोगाच्या नवीन रुग्णांची शोध मोहीम राबविली जाणार आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्वानुसार हाती घेण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान १० लाख ८८ हजार घरांमधील अंदाजित ४९ लाख लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी एक महिला आरोग्य स्वयंसेविका आणि एक स्वयंसेवक यांचा एक चमू अशा ३ हजार ११७ चमूंद्वारे तपासणी केली जाणार आहे.

काय करणार  ?  

या मोहिमेदरम्यान नव्याने आढळणाऱ्या कुष्ठ व क्षयरुग्णांची नोंदणी केली जाईल. तसेच या रुग्णांना महानगरपालिकेचे नजीकचे आरोग्य केंद्र, दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येईल. त्यानंतर पुढील आरोग्य तपासणी आणि उपचार विनामूल्य दिले जातील. महानगरपालिका आरोग्य विभागाद्वारे मुंबईतील सर्व २४ विभागांमधील २८  वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये कार्यरत ४२यंत्रांद्वारे क्षयरुग्णांकरीता विविध निदान सेवा पुरविण्यात येत आहेत.

पालिकेच्या या आरोग्य केंद्रात उपचार 
 
मुंबईतील क्षयरुग्णांना सेवा देण्याकरीता २११ आरोग्य केंद्रे आणि १८६ महानगरपालिका दवाखाने, १६ सर्वसाधारण रुग्णालये, ५ वैद्यकीय महाविद्यालये आणि २०० आपला दवाखाना मुंबईत कार्यरत आहेत. बहुआयामी प्रतिरोध (मल्टी ड्रग रेझिस्टंट) क्षयरोग रुग्णांसाठी संपूर्ण मुंबईत २७ डीआर टीबी उपचार केंद्रे कार्यरत आहेत. त्यातील ७ डीआर टीबी उपचार केंद्रे ही खासगी आहेत. 

क्षयरोगाची लक्षणे
१४ दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला, सायंकाळी ताप येणे, लक्षणीय वजन कमी होणे, कफात रक्त येणे, छातीत दुखणे, मानेवर सूज येणे 

कुष्ठरोगाची लक्षणे 
रुग्णांच्या त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टा/चट्टे येणे. जाड बधीर तेलकट चकाकणारी त्वचा कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, तसेच तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा व जखमा असणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे, चालताना पायातून चप्पल गळून पडणे इत्यादी लक्षणे आढळून येतात. 

संपूर्ण उपचार मोफत 

या मोहिमेत प्राथमिक तपासणी दरम्यान आढळलेल्या क्षयरोग व कुष्ठरोग संशयितांची तपासणी जवळच्या महानगरपालिकेच्या दवाखान्यात केली जाईल, अशी माहिती दिली. तसेच क्षयरोगासाठी थुंकीची तपासणी आणि एक्स-रे तपासणी मोफत केली जाईल.सर्व क्षयरुग्णांना पौष्टिक आहार सहाय्यासाठी उपचारा दरम्यान रुपये ५०० दरमहा त्यांच्या बँक खात्यात केंद्रीय क्षयरोग विभागामार्फत जमा केले जातात.  
डॉ. दक्षा शाह, कार्यकारी आरोग्य अधिकारी

Web Title: will seek TB and leprosy patients; Mumbai Municipal Corporation will examine 49 lakh patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.