मुंबई - येत्या ५ तारखेला सावरकर स्मारकामध्ये वीर सावरकरांवर लिहिलेल्या गीतांचा 'मी सावरकर' हा कार्यक्रम विनामूल्य असणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची दोन तिकिटे उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना सन्मानपूर्वक पाठवणार आहोत. हा कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम नव्हे हा सावरकर भक्तांचा कार्यक्रम आहे असं भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी म्हटलं.
आशिष शेलार म्हणाले की, केवळ हिंदू जन आक्रोश मोर्चावर आक्षेप, हिंदू नववर्ष यात्रेची अडवणूक आणि रामनवमीच्या मालवणीतील यात्रेतून पळवणूक या उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे. मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्याबरोबर उभे राहण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी करेल याबद्दल दुमत नाही. सावरकर म्हणजे देश, सावरकर म्हणजे महाराष्ट्र, सावरकर मराठी माणसांचा मानबिंदू, सावरकर म्हणजे भाषा शुद्धी कार्यक्रमाचे नेतृत्व, सावरकर म्हणजे लिपी शुद्ध कार्यक्रमाचे नेतृत्व, सावरकर म्हणजे मराठीतील उत्तम कवी. ज्या माणसाने मराठीची इतकी सेवा केली त्या माणसाचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसत आहेत. भारतीय जनता पक्षाने मुंबईत १६ सावरकर गौरव यात्रा पूर्ण केल्या आहेत. उरलेल्या २० यात्रा पुढील काही दिवसांत पूर्ण होतील असं त्यांनी सांगितले.
राहुल गांधीना महाराष्ट्राची माफी मागायला सांगाउद्धव ठाकरे, राहुल गांधी यांना माफी मागायला सांगा आणि मग त्यांच्याबरोबर बसा. त्यांनी हे केलं नाही. राहुल गांधी यांनी सावरकरांची माफी मागितली की, प्रकरण तात्पुरतं बाजूला ठेवलं त्याचं स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी द्यावे. महाराष्ट्र हे जाणू इच्छितो आहे. राहुल गांधी यांनी या प्रकरणात बोलायचं टाळलं, थांबवलं आहे. राहुल गांधी किंवा त्यांच्या पक्षाने यावर काहीही म्हंटल नाही. राहुल गांधी यापुढे सावरकरांचा अपमान करणार नाहीत असे म्हटल्याचे ठोस पुरावे उद्धव ठाकरे यांनी द्यावेत असं शेलार म्हणाले.
तसेच केवळ प्रकरण अंगावर येत आहे म्हणून मतासाठी हे केलं जात आहे. देशभक्तांचा, देशाचा, सावरकरांचा, हिंदूचा आणि भारताचा राहुल गांधी यांनी अपमान केलाच पण उद्धव हे महाराष्ट्र द्रोह करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. महाराष्ट्र द्रोह करणाऱ्यांच्या पंगतीमध्ये वाढपीची भूमिका उद्धव यांचा पक्ष करत आहे असा आरोपही शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर केला.