मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काल यशवंतराव चव्हाण सभागृहात राजकीय निवृत्तीची घोषणा करीत पॉवरफुल धक्का दिला. त्यामुळे मुंबईसह राज्यात होणाऱ्या आगामी महापालिका निवडणुका; तसेच २०२४ च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये विशेषत महाविकास आघाडीवर काय परिणाम होणार, याची जोरदार राजकीय चर्चा त्यांच्या नेत्यांमध्ये सुरू झाली आहे.
गेल्या सोमवारी महाराष्ट्रदिनी ‘बीकेसी’वर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. यानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे दिग्गज नेते एकत्र येत राज्यातील विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याची घोषणा शरद पवार करून महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः महाविकास आघाडीची मोठी खळबळ माजवली. त्यामुळे आगामी निवडणुका, महाविकास आघाडी एकत्र लढणार का, या आघाडीचे भवितव्य काय असेल, अशी चिंता व कुजबुज या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सुरू झाल्याचे आजचे चित्र आहे.
वज्रमूठीचा ठोसामहाराष्ट्राची अवहेलना आणि मुंबईचे वस्त्रहरण थांबविण्यासाठी एकच वज्रमूठीचा ठोसा मारा, असे आवाहन करीत महापालिका, विधानसभा व लोकसभेबरोबर तिन्ही निवडणुका घ्या, तुम्हाला भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील सभेत दिला.
आमचा सर्वांचा प्रयत्न आहे की, शरद पवार यांनीच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राहावे. देशाची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याबाबत राष्ट्रीय नेते म्हणून सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष आशेने पाहत आहेत. - नरेंद वर्मा, राष्ट्रीय सरचिटणीस, मीडिया-आयटी
शरद पवार हे देशाचे मोठे, ज्येष्ठ व श्रेष्ठ आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहे. त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राहावे की नाही, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. - शीतल म्हात्रे, प्रवक्ता-उपनेत्या, शिवसेना-शिंदे गट
शरद पवार यांचा राजीनामा हा तसा राष्ट्रवादी पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी राजीनामा मागे घेतल्यास भाजपविरुद्धच्या लढ्याला अजून बळ मिळेल. काँग्रेस कुठल्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज आहे. - ॲड. धनंजय जुन्नरकर, प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस