Join us

शिवसेना अन् भाजपा पुन्हा एकत्र येणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 6:17 PM

आमची युतीबाहेर पडण्याची इच्छा नव्हती. आम्ही एका ध्येयाने एकत्र राहिलो. मात्र आम्ही जे केलं ते प्रामाणिकपणे केलं, असं सांगायला उद्धव ठाकरे विसरले नाही.

मुंबई: गेल्या काही अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचं सरकार कधीही कोसळू शकतं. तीन वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र आल्यामुळे सरकार फार काळ टिकणार नाही, असं राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांकडून दावा करण्यात येत होता. आजही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीचं सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा केला होता. मात्र ''जशी युती टिकली तशी आघाडी टिकेल. तीन पक्ष एकत्र आले आहेत. तिघांचा हेतू प्रामाणिक असेल, तोपर्यंत महाविकास आघाडी टिकेल'', असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

एका वेबिनारमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी स्थापन झालेल्या महाविकास आघाडीबाबत भाष्य केलं आहे. युती किंवा आघाडी चांगल्या कामासाठी असेल, कामं होत असतील तर ती का टिकू नये? आपण कुणीही भविष्यवेत्ते नाही. पण काम करण्याची जिद्द असेल, तर पुढच्या कित्येक वर्षांसाठी जशी काम होईल तशी आघाडी टिकवू शकतो. जशी युती टिकली, तशीच आघाडीही टिकेल. जोपर्यंत आमच्या तिघांच्या मनातला हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक असेल, तोपर्यंत आघाडी टिकायला काय हरकत आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 

पुन्हा भाजपा-तुम्ही एकत्र येणार किंवा भाजप -राष्ट्रवादी एकत्र येणार अशा अफवा उठतात, तर या अफवाच आहेत का?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर कुरघोड्या असत्या तर हे सरकार चाललंच नसतं. स्थापन झालं तेव्हा मी नवखाच होतो, पण आम्ही एकमताने एकत्र आलो, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकत्र येणार की नाही, असा सवाल विचारल्यानंतर त्याचं उत्तर दोन्ही पक्ष वेगळे का झाले यामध्ये आहे. एका विचाराने झालेली युती तुटली का, याचं उत्तर शोधावं लागेल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

आमची युती २५ ते ३० वर्ष होती. आमची युतीबाहेर पडण्याची इच्छा नव्हती. आम्ही एका ध्येयाने एकत्र राहिलो. मात्र आम्ही जे केलं ते प्रामाणिकपणे केलं, असं सांगायला उद्धव ठाकरे विसरले नाही. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्याशी आमचे कौटुंबिक नातेसंबंध होते. पंतप्रधानांशी देखील जे आमचे वैयक्तिक नातेसंबंध आहेत, असं सांगत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवावं. वैयक्तिक संबंध वेगळे ठेवावेत, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसशिवसेनाभाजपामहाराष्ट्र विकास आघाडी