शिवसेना एनडीएच्या बैठकीत उपस्थित राहणार का?; संजय राऊत यांनी केलं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 03:07 PM2019-11-16T15:07:30+5:302019-11-16T15:18:02+5:30
भाजपा व शिवसेनेमध्ये राज्यात सत्तास्थापनेवरुन वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरु केली आहे
मुंबई: भाजपा व शिवसेनेमध्ये राज्यात सत्तास्थापनेवरुन वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरु केली आहे. भाजपा- शिवसेनेकडून युती तोडण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपाकडून देखील संसदेत सोमवारपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचे आमंत्रण शिवसेनेला पाठवले नसल्याने शिवसेनेचे नेत संजय राऊत यांना याबाबत विचारले असता शिवसेना एनडीएच्या बैठकीत उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (१८ नोव्हेंबर) सुरू होत आहे. तत्पूर्वी शिरस्त्याप्रमाणे रालोआतील घटकपक्षांची बैठक होते. भाजपकडून शिवसेना, शिरोमणी अकाली दल, संयुक्त जनता दल, अपना दल, लोकजनशक्ती पक्षाला बैठकीचे निमंत्रण पाठवले जाते. अधिवेशनापूर्वी होणारी ही बैठक अनौपचारिक असली तरी त्यास राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे. बैठकीत अधिवेशनातील रणनिती, विविध विषय, परस्पर सामंजस्य, सहमतीवर चर्चा होते. शिवसेना पक्ष नियमितपणे या बैठकीत सहभागी होत असे. गेल्या तीस वर्षात पहिल्यांदाच शिवसेनेला अद्याप निमंत्रण पाठवण्यात आले नसल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितले होते.
Shiv Sena leader Sanjay Raut on being asked if Shiv Sena will go for NDA meeting in Delhi ahead of Parliament session?: No, Shiv Sena will not go. pic.twitter.com/5NbDmFRe50
— ANI (@ANI) November 16, 2019
शिवसेनेचे मोदी सरकारमधील एकमेव मंत्री असलेल्या अरविंद सावंत यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. भाजपा आणि भाजपाच्या नेत्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे विश्वासार्हतेला तडा गेला आहे. आता राज्यात नव्या आघाडीसह शिवसेनेचे सरकार बनत आहे. अशा परिस्थितीत केंद्रात मंत्री म्हणून काम करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे. तसेच तिन्ही पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रमाबाबतही एकमत झाले आहे. किमान समान कार्यक्रमामधील करारानुसार शिवसेनेला संपूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्रिपद मिळणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह 14 मंत्रिपदे मिळतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 14 आणि काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.