Join us

Sanjay Raut: शिवसेना भवन सोडणार? की नाव बदलणार?; संजय राऊत म्हणाले शिंदेंनी ब्रिगेडियर व्हावं पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 11:03 AM

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय काल निवडणूक आयोगानं जाहीर केला. यानंतर ठाकरे गटाकडून आयोगाच्या निर्णयावर जोरदार टीका करण्यात येत आहे.

मुंबई-

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय काल निवडणूक आयोगानं जाहीर केला. यानंतर ठाकरे गटाकडून आयोगाच्या निर्णयावर जोरदार टीका करण्यात येत आहे. खासदार संजय राऊत सध्या कोकण दौऱ्यावर असून त्यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही यावरुन मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सध्या सगळे व्यवहार खोक्यावर चालत आहेत. त्यामुळे कालचा निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे खोकेबाजांचा निर्णय असल्याचं राऊत म्हणाले. तसंच ज्या कुणाच्या खिशात किंवा घशात शिवसेना पक्ष कोंबण्याचा प्रकार झाला आहे त्यांना लवकरच ठसका लागल्याशिवाय राहणार नाही, असंही राऊत म्हणाले. 

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता शिवसेना भवन सोडणार का? किंवा शिवसेना भवनावरील नाव बदलणार का? असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला असता त्यांनी याबाबतीच काहीच होणार नाही. शिवसेना भवनासह आमच्या शाखा आणि आमची प्रॉपर्टी असलेला लाखो शिवसैनिक आहे तसेच राहतील, असं संजय राऊत म्हणाले. 

शिंदेंनी ब्रिगेडियर व्हावं तो त्यांचा प्रश्न"शिवसेना पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरेच आहेत आणि तेच आमचे सेनापती आहेत. बाकी शिंदेंनी काय व्हायचं तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी स्वत:ला त्यांच्या पक्षाचं ब्रिगेडियर, लष्करप्रमुख किंवा आणखी काहीही जाहीर करावं. आम्हाला त्याच्याशी घेणंदेणं नाही. आमचा शिवसैनिक आहे तिथेच जागेवर ठामपणे उभा आहे. हिंमत असेल तर आता लगेच निवडणुका घ्या मग शिवसेना कुणाची याचा फैसला लगेच लागेल. तुम्ही निवडून येऊ शकत नाही याची कल्पना तुम्हाला आहे म्हणूनच तुम्ही निवडणूक आयोगाचा गळा दाबून असा निर्णय घ्यायला भाग पाडलं आहे", असंही संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाएकनाथ शिंदे