शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीची माहिती मागणार का?
By अतुल कुलकर्णी | Published: October 23, 2018 04:47 AM2018-10-23T04:47:11+5:302018-10-23T04:47:40+5:30
शेतकरी कर्जमाफीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर आतापर्यंत ४०.१३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे १६,६४० कोटी रुपये जमा केल्याचा दावा सरकारने केला आहे.
मुंबई: शेतकरी कर्जमाफीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर आतापर्यंत ४०.१३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे १६,६४० कोटी रुपये जमा केल्याचा दावा सरकारने केला आहे. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीची आकडेवारी मागणार का, असा सवाल केला जात आहे.
अहमदनगर येथील सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत शिवसेनेच्या मंत्र्यांनी सरकारकडे आकडेवारी मागावी, असे आदेश दिले होते. ठाकरे यांच्या आरोपानंतर सरकारने कर्जमाफीची तपशीलवार आकडेवारीच सादर केली. त्यानुसार २२.६९ लाख शेतकºयांना १२,४८७ कोटी रुपये कर्जमाफीपोटी मिळाले आहेत. तर वनटाईम सेटलमेंटमध्ये १.५३ लाख शेतकºयांचे १,५८३ कोटी रुपये माफ झाले आहेत. जे नियमित कर्ज भरत होते त्यांना देखील प्रोत्साहन म्हणून कर्जमाफी दिली गेली. त्यानुसार १५.९१ लाख शेतकºयांना २५७० कोटी रुपये कर्जमाफीपोटी दिले गेले आहेत.
आत्तापर्यंत ४८.२९ लाख खातेदार कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून त्यापैकी ४०.१३ लाख शेतकºयांना त्याचा फायदा मिळाल्याची माहिती सहकार विभागाने दिली आहे. वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे आहेत. जेव्हा कर्जमाफीच्या फाईली त्यांच्याकडे स्वाक्षरीसाठी आल्या तेव्हा यात घोटाळा दिसला नाही का, असा सवाल भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने केला आहे.
कर्जमाफीच्या याद्यांचा घोळ
जळगाव : कर्जमाफीच्या याद्यांचा घोळ दीड वर्षांपासून सुरूच आहे. जिल्ह्यातील चार हजार ९१९ शेतकºयांसाठी १७ कोटी ४८ लाख १३ हजार ५०४ रुपयांची कर्जमाफी मंजूर झाल्याची अकरावी हिरवी यादी जाहीर होताच सोमवारी ती तातडीने रद्द करण्यात आली.
>... तेव्हा भजे खात होते का?- विखे
शेतकरी कर्जमाफी योजनेत घोटाळा झाला, म्हणत उद्धव ठाकरे राज्यभर
फिरत आहेत. हे सारे घडत असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री काय फक्त भजे खायला उपस्थित असतात का? कर्जमाफी जाहीर झाली, तेव्हा या योजनेतील ८९ लाख लाभार्थी शेतकºयांची नावे ठाकरे मोजून घेणार होते, पण लाभ न मिळालेल्या राज्यातील सुमारे १ कोटी शेतकºयांपैकी साधे ८९ शेतकरीही त्यांना मोजता आलेले नाहीत. त्यामुळे शिवसेनेची विश्वासार्हता आता संपली आहे, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.