Join us

तिवरांची कत्तल करणाऱ्यांना कधी गजाआड करणार?

By admin | Published: July 11, 2015 11:20 PM

येथील मानफोडपाडा येथील पाच हेक्टर खाजण जमीन कोळंबी प्रकल्पासाठी भाडेतत्त्वावर देताना त्या जमिनीतील तिवरांच्या हजारो झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल

डहाणू : येथील मानफोडपाडा येथील पाच हेक्टर खाजण जमीन कोळंबी प्रकल्पासाठी भाडेतत्त्वावर देताना त्या जमिनीतील तिवरांच्या हजारो झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली होती. यासंदर्भात नरेश पटेल यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी निवेदने, मोर्चे काढूनही कारवाई केली जात नव्हती. या प्रकल्पात शिवसेनेच्या एका माजी आमदाराच्या मुलाची भागीदारी असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर दबाव वाढत असून त्यांच्याकडून कारवाई करण्यात चालढकल केली जात असल्याच्या निषेधार्थ आज भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.डहाणू तालुक्यातील मौजे मानफोडपाडा (सरावली) येथील सर्व्हे नं. ५७/१ अ १, अ १अ येथील खाजण जमिनीत मोठ्या प्रमाणात तिवरांची झाडे असताना तसेच मत्स्य प्रजातींचे प्रजनन व संवर्धन होत असताना त्याची कत्तल करण्यात आली. खोट्या कागदपत्रांच्या आधारे महसुल पशासनाची दिशाभूल करून ५ हेक्टर जमीन नरेश किकुभाई पटेल यांना कोळंबी प्रकल्पासाठी देण्यास भाग पाडले. त्यातील अटीशर्तींनुसार नरेश पटेल यांनी सदर आदेशापासून दोन वर्षांच्या आत प्रकल्प सुरू करणे आवश्यक असताना फेब्रुवारी २०१५ पर्यंत सदर जमिनीचा वापर न केल्याने त्यांनी अटीशर्तींचे उल्लंघन केल्याचे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे आहे. हे प्रकरण संबंधित महसूल अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याने त्याविरोधात अनेक वेळा मोर्चे, आंदोलने करण्यात आली होती व यापुर्वी २६ जून रोजी रास्ता रोकोही करण्यात आला होता.मौजे मानफोडपाडा भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजातील गरीब लोक जवळच्या खाजण जमिनीतील मासेमारीवर आपला उदरनिर्वाह चालवितात. या वर्षी जून महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जमलेले पाणी कोलंबी प्रकल्पाला घातलेल्या बांधामुळे अडले गेल्याने अनेक लोकांच्या घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या मोठ्या जमावाने कोलंबी प्रकल्पाचे बांध फोडून टाकले होते. याप्रकरणी महिलेसह काही लोकांवर गुन्हे दाखल झाल्याने व न्याय मिळत नसल्याने आज भारताच्या कम्युनिस्ट पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कडक पोलीस बंदोबस्त होता. (वार्ताहर)