धरणे मुंबईच्या विजेचा प्रश्नही सोडवणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 01:58 AM2017-12-07T01:58:06+5:302017-12-07T01:58:19+5:30
मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे आता मुंबईकरांच्या विजेचा प्रश्नही मिटवणार आहेत. तानसा धरणातील वीजनिर्मिती प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर महापालिकेने आता पालघरमधील पिसे-पांजरापोर
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे आता मुंबईकरांच्या विजेचा प्रश्नही मिटवणार आहेत. तानसा धरणातील वीजनिर्मिती प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर महापालिकेने आता पालघरमधील पिसे-पांजरापोर जलशुद्धीकरण केंद्रातही वीजनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. येथे प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पातून दररोज अडीचशे किलोवॅट वीजनिर्मिती होऊ शकेल, असा विश्वास पालिका प्रशासनाला वाटत आहे.
तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, अपर वैतरणा, भातसा या प्रमुख धरणांतून मुंबईला दररोज पाणीपुरवठा होत असतो. विजेची मागणी मुंबईत अधिक असून, महापालिकेच्या कार्यालयांमध्येच मोठ्या प्रमाणात विजेची गरज पडत असते. त्यामुळे पालिकेने तानसा धरणातून सर्वप्रथम वीजनिर्मितीचा निर्णय घेतला होता. या प्रकल्पातून दररोज ४० किलोवॅट वीजनिर्मिती केली जात आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्याने महापालिका प्रशासनाने आता पिसे-पांजरापोर येथील जलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्रावरील ३८०० चौरस मीटर छतावर सौरऊर्जेचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य वैतरणा प्रकल्प पाण्यात
मध्य वैतरणा जलविद्युत प्रकल्पासाठी २०१०पासून पालिकेचा राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. यादरम्यान पायाभूत सुविधांसाठी आतापर्यंत ५०.४८ कोटी रुपये, तर सल्लागार सेवेसाठी ४९.०८ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराला मुदत वाढवून न देण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याने आता या प्रकल्पाला राज्य शासनाकडून परवानगी पत्र मिळाल्यानंतरच ई-निविदा मागवून नवीन सल्लागाराची नेमणूक करता येणार आहे.