शिक्षणक्षेत्रातील प्रलंबित प्रश्न सोडविणार
By Admin | Published: January 14, 2017 04:47 AM2017-01-14T04:47:22+5:302017-01-14T04:47:22+5:30
कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिक्षक परिषदेतर्फे वेणूनाथ कडू यांनी शुक्रवारी अर्ज भरला.
मुंबई : कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिक्षक परिषदेतर्फे वेणूनाथ कडू यांनी शुक्रवारी अर्ज भरला. कोकण, नवी मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यांतील मंत्री, आमदार व खासदारांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कडू यांनी नवी मुंबई कोकण भवनासमोर जोरदार शक्ती प्रदर्शन केले. आमदार झाल्यास शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न सोडवणार, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
याआधी शिक्षक परिषदेचे रामनात मोते कोकण विभागातून निवडून गेले होते. मात्र त्यांच्याजागी परिषदेने यंदा कडू यांना उमेदवारी दिली आहे. त्यानुसार वेणूनाथ कडू यांनी कोकण भवनातील कोकण विभाग आयुक्तांकडे उमेदवारी अर्ज भरला.
यावेळी कडू यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार संजय केळकर, आमदार मंदा म्हात्रे, आमदार पास्कल धनारे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार नरेंद्र पवार यांसह माजी आमदार आणि शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती.
यावेळी कडू म्हणाले की, शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. निवडून आल्यावर विधिमंडळात शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील समस्यांचा पाठपुरावा करण्याचे काम शिक्षक परिषदेच्या माध्यमातून केले जाईल. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना, प्लॅन मधील शाळा, शिक्षकेतरांचा आकृतिबंध लवकर लागू करण्यासोबतच शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)