- मनोहर कुंभेजकर
मुंबई - राज्यातील मच्छिमारांच्या विविध समस्या लवकर सोडविण्यासोबत डिझेल तेलावरील कर परतावा वाटपात प्रथम प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन राज्याचे मत्स्यव्यसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिले आहे. महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या शिष्टमंडळाने मच्छिमारांच्या समस्या सोडविण्यासाठी केलेल्या मागणीनुसार मत्स्यव्यसाय मंत्री अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.
यावेळी समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो यांनी मच्छिमारांच्या विविध समस्या अस्लम शेख यांच्यासमोर मांडल्या. हवामान खात्याने दिनांक 1ऑगस्ट 2019 पासून ते 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत सतत वादळे व अतिवृष्टीचा इशारा दिला होता. तसेच, मच्छिमार सह. संस्थांनी मासेमारी नौकांसाठी डिझेल पुरवठा केला आहे. हे पुरावे घेऊन मत्स्यव्यवसाय खात्याने पंचनामे करणे आवश्यक असताना ते केले नाही. त्यामुळे किमान एक हजार कोटींचे नुकसान झाले आहे. शासनाने किमान 100 कोटी रुपये तरी मच्छिमारांना अर्थिक मदत करावी, अशी मागणी लिओ कोलासो यांनी केली.
यावर, डिझेल तेलावरील थकीत रू. 187 कोटींपैकी मागील 60 कोटींच्या तरतूदीमधून 48 कोटी व डिसेंबर अधिवेशनात 50 कोटींच्या तरतुदीमधून 30 कोटी असे एकूण 78 कोटी रुपये वाटपासाठी दिले आहेत. उर्वरित परतावा 09 कोटी रुपयांची रक्कम मार्च 2020 अधी 90% देण्यात येईल. तसेच, परतावा वाटप करताना लहान मच्छिमारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तसेच, वादळे व अतिवृष्टीमुळे मच्छिमारांचे यावर्षी मोठे नुकसान झाले आहे. मच्छिमारांच्या मागणीनुसार नुकसान भरपाईचा अहवाल येत्या आठवड्यात तयार करण्याचे आदेश मत्स्यव्यसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. याशिवाय, नॅशनल फिश वकर्सचे फोरमचे (एनएफएफ)चे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार ओएनजीसीच्या सेसमिक सर्व्हे बाबत माहिती दिल्यानंतर या कंपनीसोबत बैठक आयोजित करावी, तोपर्यंत सर्व्हे करू नयेत, असे आदेशही अस्लम शेख यांनी यावेळी दिले आहेत.
या बैठकीत मासेमारी नौकांवर सीसीटीव्ही कॅमेरे व व्हीटीएस यंत्रणा बसविणे, मच्छिमारांना कर्जमाफी देणे, पालघर जिल्ह्यातील वाढवण व जिंदाल बंदराला विरोध, चित्रा खलिजा जहाज अपघात नुकसान भरपाई, दुष्काळ निकष बदलणे, मासेमारी बंदरे विकसित करणे इत्यादी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी बैठकीला एनएफएफचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो, सरचिटणीस किरण कोळी, उपाध्यक्ष राजन मेहेर, महिला संघटक पौर्णिमा मेहेर, मुंबई महिला संघटक उज्वला पाटील, पालघर-ठाणे महिला संघटक ज्योती मेहेर, मढ दर्यादीप मच्छिमार सह संस्थेचे अध्यक्ष संतोष कोळी, मढ मच्छिमार स. सह. संस्थेचे संचालक उपेश कोळी तसेच मत्स्यव्यसाय आयुक्त राजीव जाधव, सह. आयुक्त राजेंद्र जाधव, उपायुक्त देवरे इत्यादी आदी मान्यवर उपस्थित होते.