लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महिलांचा उद्योग क्षेत्रातील सहभाग वाढविण्यासाठी, त्यांच्या ऑनलाइन उद्योगाला ही गती व दिशा देण्यासाठी महिला उद्योजिकांसाठीचे स्वतंत्र असे ऑनलाइन ॲप्लिकेशन सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी दिली. मुंबई विद्यापीठाच्या बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्राकडून आयोजित एकदिवसीय आभासी कार्यशाळेत महिला नेतृत्वाच्या नव्या दिशा या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कोविड १९चा काळ हा सगळ्यांसाठीच संकटाचा काळ आहे. मात्र या संकटकाळाकडे प्रत्येकाने संधी म्हणून पाहायला हवे असे त्यांनी आवर्जून नमूद केले. दरम्यान, संकटाच्या या काळात महिला बचत गटांकडून ३ महिन्यांत ४ कोटी मास्क तसेच अनेक पीपीई किट फ्रंटलाइन वर्कर्ससाठी देण्यात आल्याची माहिती ही त्यांनी दिली.
या एकदिवसीय आभासी कार्यशाळेचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आले, तर मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यता शीतल शेठ देवरुखकर आणि इतर युवासेना अधिसभा सदस्यांकडून याचे आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रमामध्ये राजकीय आणि सामाजिक नेतृत्व लाभलेल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या एजीपी डॉ. ॲड. उमा पळसुलेदेसाई यांनीही मार्गदर्शन केले. महिला दिन हा स्त्रियांचे समाजातील स्थान, सन्मान यांचे प्रदर्शन करण्याचा दिवस नसून स्त्रियांच्या अधिकार चळवळीतील महत्त्वाचा टप्पा असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले. युएन वुमन या संस्थेद्वारे घोषित करण्यात आलेली यंदाची महिला दिनाची थीम तसेच त्यांच्याद्वारे चालविण्यात येणाऱ्या वाईट बँड कॅम्पेन, ऑरेंज डेसारख्या मोहिमांविषयीही माहिती दिली. स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा दिशा कायदा हा पुढील अधिवेशनात आवश्यक सुधारणा व बदलांसह आणण्यात येणार असून त्याला मंजुरी देण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती त्यांनी या दरम्यान दिली.
स्त्रियांनी वेळात वेळ काढून आपली सुरक्षितता, स्वातंत्र्य, अधिकार यांच्याविषयी असलेले कायदे, नियम यांच्याविषयी अभ्यास करायला हवा, माहिती घ्यायला हवी आणि सजग राहायला हवे असा मोलाचा कानमंत्र ॲड. उमा पळसुलेदेसाई यांनी महिला कायदे :: स्वरूप आणि विशेष या आपल्या सत्रादरम्यान विद्यार्थिनींना दिला. स्वतःच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी स्त्रियांना कायदा माहीत असणे आवश्यक असून गुन्हा घडण्याआधीच त्याविषयीची जागृती त्यातून मिळू शकणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला. मात्र स्त्रियांनी त्यांच्या समाधान, सुरक्षिततेसाठी असणाऱ्या कायद्यांचा वापर एखाद्या निरपराध व्यक्तीला अडकवण्यासाठी, शिक्षा करण्यासाठी करू नये असेही त्यांनी अधोरेखित केले. उद्योग क्षेत्रातील उगवते नेतृत्व या विषयावर बोलताना ज्योती ठाकरे यांनी विद्यार्थिनींना छोट्या व्यवसायापासून सुरुवात करा, बँक कर्ज याव्यतिरिक्त स्वतःचे असे भांडवल ही व्यवसायासाठी उभे करा, उद्योगांसाठी आवश्यक त्या नियोजनाची आणि देण्याची तयारी ठेवा असे महत्त्वाचे कानमंत्रही दिले.