मुंबईकरांसाठी खूशखबर; मुख्यमंत्र्यांच्या खास घोषणेनं प्रवास होणार सुसाट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 01:24 PM2019-09-07T13:24:30+5:302019-09-07T13:26:18+5:30
मेट्रो मार्गिकांच्या पायाभरणी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास लवकरच सुसह्य आणि सुपरफास्ट होणार आहे. इंटिग्रिटेड तिकीट सिस्टिम सुरू करणारं मुंबई देशातलं पहिलं शहर असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यामुळे एकाच तिकीटावर संपूर्ण शहरात प्रवास करता येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रो मार्गिकांचं भूमीपूजन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज वांद्रे-कुर्ला संकुलात तीन मेट्रो मार्गांची पायाभरणी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांच्या वतीनं पंतप्रधानांचे आभार मानले. मेट्रोमुळे प्रवास वेगवान होईल. त्यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचेल. मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणाऱ्या मेट्रो अत्याधुनिक असतील. त्यामुळे मानवी, तांत्रिक चुकींचं प्रमाण अत्यल्प असेल, असं फडणवीस म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी इंटिग्रिटेड तिकीट सिस्टिमचा उल्लेख केला. इंटिग्रिटेड तिकीट सिस्टिममुळे संपूर्ण मुंबईत एकाच तिकीटवर प्रवास करता येईल आणि अशा प्रकारची प्रणाली राबवणारं मुंबई हे देशातलं पहिलं शहर असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी मेक इन इंडियाचादेखील उल्लेख केला. मेट्रोच्या डब्यांच्या निर्मितीचं काम मेक इन इंडियाच्या अंतर्गत होईल. त्यामुळे मेट्रोचे डबे आपल्याला आयात करावे लागणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मोदींनी काश्मीरमधून कलम 370 हटवल्याबद्दल मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं. चांद्रयान-2 मोहिमेच्या निर्णायक क्षणी मोदी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांसोबत उपस्थित होते. शास्त्रज्ञांना प्रेरणा देणारा पंतप्रधान यावेळी जगानं मोदींच्या रुपात पाहिला, अशी स्तुतीसुमनं मुख्यमंत्र्यांनी उधळली.