मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे इतर क्षेत्रांप्रमाणेच शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. दहावीचा भूगोलाचा पेपर वगळता राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षा व्यवस्थित पार पडल्या असल्या तरी पेपर तपासणी आणि निकालाबाबत अनेक अडथळे येत आहेत. दरम्यान, आता सीबीएसई बोर्डाच्या एका निर्णयामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशावेळी एका नव्या आव्हानाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. याबाबत भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विटरवरून राज्य सरकारसमोर सवाल उपस्थित केला आहे.
सीबीएसई बोर्डाने विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ थ्री नुसार गुण देण्याची योजना आखली आहे. त्यामुळे सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ थ्रीनुसार गुण मिळणार, तर एसएससीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ फाइव्ह नुसार गुण मिळणार, मग एसएससी बोर्डाचे विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशात मागे पडणार, अशी भीती शेलार यांनी उपस्थित केली आहे. सरासरी सरकारमुळे एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार अशी टीका शेलार यांनी केली आहे.
तसेच राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील अव्यवस्थेवरून शेलार यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत महाविकास आघाडीच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एटीकेटीच्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थ्यांचा निर्णय कधी होणार?, शाळांनी शुल्कवाढ करु नये याबाबत घेतलेला निर्णय टिकला नाही. सरकारने न्यायालयात बोटचेपी भूमिका का घेतली? या अंतरिम स्थगितीला सरकार पुन्हा न्यायालयात आव्हान देणार ? की संस्था चालकांचा फायदा करणार? अशी विचारणाही शेलार यांनी केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या