वाढवण बंदर उभारणीच्या विरोधात भूमिपुत्रांच्या बाजूने उभे राहणार; उद्धव ठाकरे यांचे आश्वासन
By मनोहर कुंभेजकर | Published: December 2, 2023 02:15 PM2023-12-02T14:15:52+5:302023-12-02T14:16:30+5:30
वाढवण बंदर उभारणीच्या पार्श्भूमीवर दिनांक २२/१२/२०२३ रोजी पालघरमध्ये जन सुनावणीचे आयोजन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ (एमपीसीबी) च्या माध्यमातून होणार आहे.
मुंबई वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समितीच्या विनंतीला मान देऊन शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाढवण बंदर विरोधी समितीच्या शिष्टमंडळाला मातोश्री निवासस्थानी भेट देऊन वाढवण बंदर उभारणीच्या विरोधात शिवसेना (उबाठा) भूमिपुत्रांच्या सोबत ठाम उभे राहणार असल्याचे ठोस आश्वासन दिले.तसेच हे बंदर न होऊ देण्यासाठी आणि जन सुनावणीला विरोध दर्शवत भूमिपुत्रांनी पुकारलेल्या बंदर विरोधी एल्गारामध्ये स्वतः सामील असल्याचे आश्वासन भूमिपुत्रांना दिले असल्याची माहिती समितीचे कार्यवाह सदस्य अनिकेत पाटील यांनी लोकमतला दिली.
वाढवण बंदर उभारणीच्या पार्श्भूमीवर दिनांक २२/१२/२०२३ रोजी पालघरमध्ये जन सुनावणीचे आयोजन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ (एमपीसीबी) च्या माध्यमातून होणार आहे. सदर जन सुनावणीत प्रस्तावित बंदरामुळे पर्यावरणावर निर्माण होणाऱ्या विपरीत परिणामांच्या धर्तीवर जे.एन.पी.ए कडून बनविण्यात आलेल्या पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकनावर हरकती नोंदविण्यासाठी जन सुनावणीच्या आयोजन करण्यात आले आहे.
कुठल्याही नवीन प्रकलपाला हिरवा कंदील मिळण्यासाठी जन सुनावणी होणे अनिवार्य आहे. देशात आता पर्यंत झालेल्या जन सुनावणीचा इतिहास पाहता स्थानिकांकडून पूर्णतः विरोध जरी दर्शविला असेल तरी प्रकल्प रेटण्याचा प्रकार सर्रास होतानाचे चित्र दिसून आले आहे. प्रकल्प तज्ञांच्या मते जन सुनावणी झाल्यास प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण विभगाची परवानगी मिळण्यासाठी मार्ग मोकळा होईल. त्याकरिता जन सुनावणीला संवैधानिक मार्गाने विरोध करण्याची भूमिका भूमिपुत्रांकडून घेण्यात आली असल्याचे वातावरण पालघर जिल्ह्यात निर्माण झाले असल्याची माहिती समितीचे कार्यवाहक सदस्य मिलिंद राऊत यांनी दिली.
उद्धव ठाकरे यांनी बंदर विरोधी लढ्याला पाठिंबा दिले असून दिनांक २२/१२/२०२३ रोजी होणाऱ्या जन सुनावणी मध्ये भूमिपुत्रांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे नियोजन बंदर विरोधी समित्यांकडून होणार असल्याचे शिष्टमंडळाने त्यांना माहिती दिली. सदर सभेला खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, माकपाचे डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले, विधान परिषदेचे आमदार सुनिल शिंदे, शिवसेना (उ.बा.ठा) पालघर जिल्हाप्रमुख विकास मोरे व राजेंद्र पाटील , जि.प सदस्य व गटनेते तथा शिवसेना (उ.बा.ठा) पालघर विधानसभा संघटक जयेंद्र दुबळा, वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समिती, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, लोकप्रहार सेना, भूमिसेना-आदिवासी एकता परिषद, पाणेरी बचाव संघर्ष समिती, समुद्र बचाव मंच, सागर कन्या मंच, सोसायटी फॉर फास्ट जस्टिस आदी समितीमधील पदाधिकारी सभेला उपस्थित असल्याची माहिती वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समितीचे कार्यवाह सदस्य देवेंद्र तांडेल यांनी दिली.