मुंबई : जलमार्ग हा सर्वांत उत्तम मार्ग असून मुंबईत जलमार्ग सुरू केल्यास विमानतळावर जाण्यास सुलभता येईल. त्यामुळे मुंबईत मिठी नदीवर जलमार्ग सुरू करण्यात येणार आहे. तसेच नवी मुंबई विमानतळावर जायला जलमार्ग उभारण्याबाबतच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक अहवाल प्राप्त झाला असून लवकरच कामाला सुरवात होईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग, जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली.वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात गुरुवारी तुहीन ए. सिन्हा लिखित ‘इंडिया इन्स्पायर्स : रीडिफायनिंग द पॉलिटिक्स आॅफ डिलिव्हरन्स’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एनएआरईडीसीओचे राष्ट्रीय अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, उद्योगपती रतन टाटा, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, एनटीआय आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार उपस्थित होते.गडकरी म्हणाले, जलमार्ग करताना पर्यावरणाचा प्रश्न येतो. पर्यावरणाचा समतोल राखून विकास करण्यात येणार आहे. देशासाठी पर्यावरण आणि विकासात्मक प्रकल्प दोन्ही महत्त्वाचे आहेत. मुंबईच्या समुद्रात स्वत:ला पाहिल्यावर आपला स्वत:चा चेहरा दिसला पाहिजे, इतके समुद्राचे पाणी शुद्ध असले पाहिजे. देशात १२ एक्सप्रेस हायवे तयार होणार आहेत. मुंबई - दिल्ली एक्सप्रेस हायवे तयार होणार असून १२ तासात मुंबईहून दिल्लीला जाता येणार आहे. गंगा नदी स्वच्छता आणि नवे जलसिंचन प्रकल्प राबविण्यात आले आहेत. गंगा नदी पुढच्या मार्चपर्यंत शुद्ध केली जाईल.या चार वर्षांत चांगली कामे केली. मात्र रस्ते अपघात रोखण्यास अपयश आले आहे. यात खोटे ड्रायव्हिंग लायसन्स चालक असल्याने अपघात वाढत आहेत. अपघात कमी करण्यासाठी अपघात निवारण समिती स्थापन केली आहे. येत्या काळात बायोप्रकल्प सुरू केल्यास ५० लाख तरुणांना नोकरीची संधी मिळेल.सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नितीन गडकरी विकासात्मक प्रकल्पावर, शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवायचे यावर गप्पा मारतात. त्यांच्यादूरदृष्टी आहे. न्यूटन, नेपोलिन यांसारख्या मोठ्या व्यक्तींच्या नावापुढे ‘एन’ आहे. त्याचप्रमाणे नितीन गडकरी यांच्या नावामध्ये ‘एन’ आहे. समृद्धी महामार्गाचे बीज त्यांनी रोवले आहे.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संपर्क साधला. ते म्हणाले, प्रकाशित केलेले पुस्तक खूप प्रेरणादायी आहे. या पुस्तकातून कार्यकुशलता, व्यक्तिमत्त्व वाढवण्यास मदत होईल. निरंजन हिरानंदानी म्हणाले, या पुस्तकातून लेखक तुहीन सिन्हा यांनी नितीन गडकरी यांच्या कार्यपद्धतीचे बारकावे मांडले आहेत. नितीन गडकरी देशासाठी खूप चांगले काम करीत आहेत.
मिठी नदीवर जलमार्ग सुरु करणार - गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 5:39 AM