Join us  

एसटीचे पुनरुज्जीवन होणार का?

By admin | Published: January 24, 2016 1:01 AM

शहरी भागाबरोबरच गावागावांत पोहोचलेल्या एसटीला गेल्या काही वर्षांत आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. या आर्थिक संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एसटी महामंडळाचे

(निमित्तमात्र)

- सुशांत मोरे

शहरी भागाबरोबरच गावागावांत पोहोचलेल्या एसटीला गेल्या काही वर्षांत आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. या आर्थिक संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एसटी महामंडळाचे पुनरुज्जीवन केले जात आहे. प्रवाशांसाठी नवनवीन बसगाड्या आणि सुविधा देतानाच एसटी कर्मचाऱ्यांसाठी नवीन योजना आणण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. परंतु त्या कितपत यशस्वी ठरतील, त्याचा प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना कितपत फायदा मिळेल हे पाहण्यासारखे ठरेल.सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य असणाऱ्या एसटीची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षांत चांगलीच बिघडली. मोडकळीस आलेल्या बसगाड्या, त्यातून प्रवास करताना प्रवाशांना होणारा मनस्ताप, गर्दीच्या काळात वेळेत न मिळणाऱ्या बसगाड्या, अवैध वाहतूक यासह अन्य कारणांमुळे ७५ लाख प्रवासी असणाऱ्या एसटी महामंडळाकडे प्रवाशांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली. जवळपास ११ कोटी प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरविल्याची माहिती नुकतीच समोर आली. २0१३-१४मध्ये २५६ कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. हाच प्रवास २0१४-१५मध्ये फक्त २४५ कोटी प्रवाशांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले. हे पाहता २0१३-१४मध्ये दररोज ७0 ते ७१ लाखांच्या दरम्यान प्रवाशांची वाहतूक झाली होती. तीच वाहतूक २0१४-१५मध्ये दररोज ६७ ते ६८ लाख इतकी झाली. प्रवासी वाहतुकीबरोबरच उत्पन्नही कमी झाल्याने या वेळेचा एसटीचा संचित तोटा हा १,८00 कोटी रुपयांवर पोहोचला. यातून बाहेर पडण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर प्रवासी आणि एसटी कर्मचाऱ्यांसाठी नव्या सुविधा आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ५00 शिवशाही एसी बसेस, अपघात सहायता योजना, कन्यादान योजना, सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल, कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी मोटार वाहन अभियांत्रिकी महाविद्यालय अशा पाच घोषणा एसटी महामंडळाकडून करण्यात आल्या असून, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी होईल, हा मोठा प्रश्न आहे.एसटी महामंडळ ५00 एसी बसगाड्या भाडेतत्त्वावर घेणार असून, त्या सर्वांत हायटेक आहेत. शिवशाही नाव देण्यात आलेल्या या बसगाड्यांमध्ये सीसीटीव्ही, वाय-फाय, जीपीएस, मोबाइल आणि लॅपटॉप चार्जरसारख्या सुविधा आहेत. शिवशाही बसगाड्या सर्वसामान्य जनतेला आणि खासकरून ग्रामीण भागातील जनतेला परवडणाऱ्या असतील, असा दावा एसटीकडून करण्यात आला आहे. परंतु आतापर्यंतचा इतिहास पाहिल्यास एसटीच्या एसी बसगाड्यांना मिळालेला प्रतिसाद हा मुंबई-पुणे, ठाणे, औरंगाबाद, नाशिकसह काही मोजक्याच मार्र्गांवर आहे. तर अन्य मार्गांवर एसी बसेसचा प्रयोग सुरू करताच त्या बंद करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. एसटीकडून नुकत्याच मुंबई-हैदराबाद मार्गावर सुरू करण्यात आलेल्या एसी बस सेवेलाही अद्याप प्रतिसाद मिळत नसून महामंडळ प्रवाशांची प्रतीक्षा करत आहे. या महत्त्वाच्या सुविधेबरोबरच अपघातग्रस्त प्रवाशाला किंवा त्याच्या नातेवाइकाला चांगली आर्थिक मदत मिळावी यासाठी अपघात सहायता निधी योजना अंमलात आणली जाणार आहे. योजनेनुसार अपघातात मृत झालेल्या प्रवाशाच्या नातेवाइकास १० लाख रुपये मिळतील; तर कायमचे अपंगत्व आलेल्या प्रवाशाला ५ रुपये मिळतील. यात अगोदर असलेल्या ३ लाख रुपयांच्या विम्यात एसटीकडून वाढ करत ती १० लाख रुपये एवढी करण्यात आली. यासाठी तिकिटावर १ रुपयापासून पुढे अधिभार लावण्यात येणार असून, त्यातून मिळणाऱ्या पैशातून १० लाख रुपये विम्याची रक्कम उभी केली जाईल. यामुळे प्रवाशांच्या खिशातलेच पैसे प्रवाशांनाच देण्यात येतील. या योजनेला खुद्द एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाच विरोध होता. खासगी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे एसटीवरच आर्थिक बोजा पडणार असल्याने ती आपणच राबविली तर फायदेशीर ठरेल, असे मत व्यक्त करण्यात आले; आणि आता एसटीकडूनच ही योजना राबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांसाठी असलेल्या या दोन योजनांबरोबरच कर्मचाऱ्यांसाठीही नियोजन करण्यात आले आहे. कन्यादान योजना, सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल आणि मोटार वाहन अभियांत्रिकी महाविद्यालय बांधण्याचे स्वप्न कर्मचाऱ्यांना दाखवण्यात आले असून, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होईल का आणि ती कधी असा प्रश्न आहे. कन्यादान योजनेत एसटी कर्मचाऱ्यांच्या घरी जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावावर एसटीच्या बँकेत १७ हजार ५00 रुपये मुदतठेव ठेवण्यात येईल आणि ही रक्कम २१व्या वर्षी त्या मुलीला किंवा कर्मचाऱ्याला मिळेल. या योजनेची सुरुवात येत्या एप्रिल महिन्यापासून केली जाणार आहे. याचे एसटी कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महामंडळाने पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांसाठी रुग्णालय उभारण्याचा निर्णयही घेतला आहे. सुपरस्पेशलिटी असणारे रुग्णालय तीन वर्षांत बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १00 खाटांच्या या रुग्णालयात २५ टक्के खाटांवर एसटी कर्मचाऱ्यांना मोफत उपचार मिळतील. एसटीला मोठ्या प्रमाणात अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांची गरज लागते. हे पाहता कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोटार वाहन अभियांत्रिकीचे शिक्षण मिळावे यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयही उभारले जाणार आहे. वाशी येथे या महाविद्यालयाचे भूमिपूजनही करण्यात आले असले तरी त्यासाठी मोठा खर्च येणार आहे. त्यामुळे एसटीच्या खर्चात आणखी भर पडेल. एकूणच महामंडळाकडून प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सोयिसुविधांची ही स्वप्ने दाखवताना त्याचा विसर पडू नये.