Join us

सुनील तटकरेही भाजपत जाणार? चर्चा तर होणारच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 5:57 AM

चर्चांना उधाण : ‘मेगाभरती’ची बैठक सुरू असताना पोहोचले चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी

अलिबाग : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात ‘मेगाभरती’ सुरू आहे. विशेषत: राष्ट्रवादी पक्षातून मातब्बर नेते या पक्षात दाखल होत आहेत. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानाला राजकीय आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशात काही कामानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या घरचा उंबरा ओलांडल्याने, तेही ‘कमळ’ हातात घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नुकतेच भाजपच्या डेऱ्यात दाखल झालेले मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव पिचड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, गणेश नाईक यांचे पुत्र आमदार संदीप नाईक यांची भाजप प्रवेशाआधी चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत बैठक सुरू असतानाच तटकरेही तेथे पोहोचले. मात्र, ते तेथून तातडीने बाहेर पडले. असे असले तरीही तटकरेंनी नेमकी ‘वेळ’ साधल्याने तेही भाजप प्रवेश करतील की काय? असे कयास बांधले जाऊ लागले आहेत. दरम्यान, तटकरे यांनी लोकसभेच्या विजयानंतर जिल्ह्यातील विकासकामांसदर्भात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली होती. ती भेटही ‘हेतुपूर्ण’ होती, अशा चर्चाही जिल्ह्यात सध्या सुरू आहेत.आम्ही एकनिष्ठ - अनिकेत तटकरेसुनील तटकरेंच्या भाजप प्रवेशाविषयी त्यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना विचारले असता, आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :सुनील तटकरेभाजपाचंद्रकांत पाटील