मुंबई - नाट्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे काम प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या रिक्त जागा घटनेच्या तरतुदीनुसार भरणे आवश्यक आहे आणि यासाठी कार्यकारी समिती व नियामक मंडळाच्या सभेचे आयोजन करावे, अशी सूचना नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार व शशी प्रभू यांनी नाट्य परिषदेचे अध्यक्ष या नात्याने नरेश गडेकर यांना दिली होती. त्यानुसार, पुढील १५ दिवसात यावर कार्यवाही होईल, असे नरेश गडेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
यासंदर्भात, नाट्य परिषदेच्या तहहयात विश्वस्तांच्या मतांचा आदर, प्रमुख कार्यवाह व विश्वस्त मंडळाचे निमंत्रक शरद पोंक्षे यांनी करून योग्य ते सहकार्य करावे, अशी भावना नियामक मंडळ सदस्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, नाट्य परिषदेत पुन्हा नव्याने घडणाऱ्या घडामोडींमुळे नाट्यवर्तुळात चर्चा रंगली असून, पुढे नक्की काय होणार याकडे नाट्यसृष्टीचे लक्ष लागून राहिले आहे.
चौकट:
सात दिवसात उत्तर देऊ...
नाट्य परिषदेतर्फे शरद पोंक्षे यांनी गुरुवारी नरेश गडेकर यांना एक पत्र दिले आहे. आपण नाट्य परिषदेचे अध्यक्ष असल्याच्या संदर्भात कोणतेही आदेश सहायक धर्मादाय आयुक्तांनी पारित केलेले नाहीत, असे या पत्रात त्यांनी म्हटले आहे. आपल्या पत्रव्यवहाराच्या संदर्भात सात दिवसात समर्पक उत्तर दिले जाईल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.