पंढरपूर कॉरिडॉरसाठी सर्वांना विश्वासात घेणार: उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 06:07 AM2023-03-14T06:07:52+5:302023-03-14T06:08:24+5:30
लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरचा कॉरिडॉर करताना वारकरी आणि स्थानिकांना विश्वासात घेणार.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरचा क्षेत्रविकास (कॉरिडॉर) करताना वारकरी आणि स्थानिकांना विश्वासात घेणार. शहरातील गल्ल्या, रस्ते, घाट, चंद्रभागाकाठाचा विकास, मंदिर ते पालखी मार्ग याकडे कॉरिडॉर तयार करताना खास लक्ष देणार असल्याचे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिले.
पंढरपूर कॉरिडॉर विषयावर आमदार मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उदय सामंत यांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ कॉरिडॉर तसेच मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल कॉरिडॉर प्रकल्पाच्या धर्तीवर पंढरपूर या तीर्थस्थळाचा विकास करण्याची घोषणा ऑक्टोबर २०२२ मध्ये पर्यटन मंत्री यांच्याकडून झाली होती. या घोषणेनंतर पंढरपूरसह वारकऱ्यांनी या विकासाला विरोध केला होता. या विकास आराखड्यात जुनी मंदिरे़, मठ, यांचे पुनर्वसन करावे लागणार होते. तसेच शहरातील गल्ल्या, रस्ते, घाट, विठ्ठल मंदिर ते पालखी मार्ग याकडे कॉरिडॉर तयार करताना खास लक्ष द्यावे लागणार होते. या घोषणेविरोधात काही लोकप्रतिनिधींनी न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली असल्याची बाब कायंदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली.
हरकतींचे निराकरण
मंत्री उदय सामंत म्हणाले, सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील खासदार, आमदार, पालखी संस्थानाचे विश्वस्त, वारकरी, तज्ज्ञ मंडळी आदींच्या समक्ष तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे सादरीकरण केले आहे. त्यामुळे काही सूचना तसेच हरकती आल्या आहेत. त्याचेही निराकरण करण्यात येईल. यावेळी सचिन अहिर, सुनील शिंदे यांनी चर्चेत भाग घेतला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"