उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून हटवणाऱ्यांचा सूड घेणार; आमदार सुनील राऊतांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 12:30 PM2022-08-11T12:30:21+5:302022-08-11T12:30:48+5:30
बाळासाहेब ठाकरे सर्वांचेच आहेत. मराठी माणसांचे आहेत. परंतु पक्ष कुणी बांधला? बाळासाहेबांनंतर भाजपानं शिवसेनेची युती तोडली तेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना लढली असं आमदार सुनील राऊत म्हणाले.
मुंबई - शिवसेना फोडून बाळासाहेबांची गद्दारी करण्याचं शुभ काम शिंदे गटाने केले आहे. त्यापेक्षा वेगळे चांगले काम काय करणार? ज्या लोकांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरवलं. त्या सर्वांचा सूड घेणार असा इशारा शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी दिला आहे. सुनिल राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आहेत.
सुनील राऊत म्हणाले की, ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यापैकी कुणीही बाळासाहेबांचा उल्लेखही केला नाही. बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. आज बाळासाहेबांना आम्ही उद्धव ठाकरेंच्या रुपात बघतो. बाळासाहेबांच्या पुत्राला वर्षावरून मुख्यमंत्री हटवून बाहेर काढलं ही कसली निष्ठा आणि बेगडी प्रेम आहे. हे उसणं दाखवलेले प्रेम आहे. जनतेचा, मराठी माणसाचा विश्वास शिंदे गटावर नाही आणि ठेवणार नाही असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला.
तसेच बाळासाहेब ठाकरे सर्वांचेच आहेत. मराठी माणसांचे आहेत. परंतु पक्ष कुणी बांधला? बाळासाहेबांनंतर भाजपानं शिवसेनेची युती तोडली तेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना लढली. शिवसेना बाळासाहेबांची आणि उद्धव ठाकरेंची आहे. गद्दारी करून जे मिळवले त्यात खुश राहा. आम्हाला आमचं काम करू द्या. आम्ही उद्धव ठाकरेंना पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर बसवणार आणि ज्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरवलं त्यांचा आमच्या पद्धतीने सूड घेणार असा इशारा आमदार सुनील राऊत यांनी दिला आहे. दरम्यान, शिवसेना पक्ष फोडून, बाळासाहेबांची गद्दारी करण्याचं चांगलं, शुभ काम शिंदे गटाने केले आहे. त्यामुळे यापेक्षा आणखी वेगळं चांगले काम काय करणार असंही राऊत म्हणाले.
शिंदे गटातील मंत्र्यांनी केले बाळासाहेबांना वंदन
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिलाच कॅबिनेट विस्तार मंगळवारी पार पडला. या विस्तारात शिंदे गटातील ९ जणांना संधी देण्यात आली. यात उदय सामंत, शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार, संजय राठोड, दादा भुसे, संदीपान भुमरे, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत यांचा समावेश आहे. शिंदे गटातील मंत्र्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे जाऊन शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. त्यावेळी मंत्र्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.