Join us

Abdul Sattar: शरद पवारांचे मार्गदर्शन घेणार, अब्दुल सत्तारांनी सांगितली पुढील रणनिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 3:19 PM

अतिवृष्टीमुळे नागपूर विभागाला मोठा फटका बसला आहे. नुकतेच केंद्रीय पथक विभागाच्या दौऱ्यावर येऊन गेले आहे

मुंबई - शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यानुसार, आज सकाळी १०.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी विभागातील कृषी विभागाचा आढावा घेतील. त्यानंतर ते पांझलीबोधी व वारंगा येथील अतिवृष्टीने बाधित पिकांची पाहणी करुन पत्रकारांशी संवाद साधला. नागपूरसह विदर्भात झालेल्या अतिवृष्टीसंदर्भात माहिती देताना शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करणार असल्याचं आश्वासन सत्तार यांनी दिलं आहे. तसेच, जुलै महिन्यापर्यंतचे पंचनामे झाले असून पुढील पंचनामे करण्याचेही आदेश देण्यात आल्याचं ते म्हणाले. यावेळी, शेतीविषयक प्रश्नांसाठी आपण शरद पवारांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

अतिवृष्टीमुळे नागपूर विभागाला मोठा फटका बसला आहे. नुकतेच केंद्रीय पथक विभागाच्या दौऱ्यावर येऊन गेले आहे. त्यांनी पाहणी केली. त्यानंतर येथील पिकांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे. केंद्राचे पथक पुन्हा एकदा पाहणी करण्यासाठी येणार आहे. दरम्यान, झालेल्या नुकसानीपेक्षा कितीतरी कमी नुकसान दाखवण्यात आल्याची ओरड केली जात आहे. त्यामुळे कृषिमंत्री सत्तार यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वच शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. 

नागपूर विभागात झालेल्या अतिवृष्टीचा नुकसान आढावा घेतला असून जुलै पर्यंतचे पंचनामे 100 टक्के झाले आहेत. त्यानंतर झालेल्या पावसाचे नुकसानीचे पंचनामे अर्धे झाले आहेत. यावेळी, अनेक नागरिक जन प्रतिनिधींची मी भेट घेतली. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी शासन घेत आहे. पुढील 3, 4 दिवसात सगळे पंचनामे होतील. सोमवारी मी सभागृहात यासंदर्भात निवेदन करणार असल्याचं मंत्री सत्तार यांनी यावेळी सांगितलं. 

तसेच, शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे शक्य आहे, ते आम्ही करणार आहोत. राज्यातील मंत्री, कलेक्टर आणि महसूल अधिकारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिवसभर त्यांच्या जीवन शैलीचा अभ्यास करणार आहेत. प्रशासनाला शेतकऱ्यांची व्यथा समजण्यासाठी हा प्रयोगशील उपक्रम राबविण्यात येईल, असे मंत्री अब्दुल सत्तार यांनी जाहीर केले. तसेच, कृषी विषयक प्रश्नांवर शरद पवार यांचे मार्गदर्शन घेणार असून यासंदर्भात लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचंही सत्तार म्हणाले. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आम्ही शेतकाऱ्यांसोबत संवाद साधणार. नियमांचा अभ्यास करुन ओला दुष्कार जाहीर करू, असेही सत्तार यांनी म्हटले. 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसअब्दुल सत्तारशेतकरी