Join us

विना मास्क फिरणाऱ्यांवर करणार तीव्र कारवाई; दररोज २० हजार लोकांना दंड करण्याचे लक्ष्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 7:53 PM

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अन्य उपाय योजनांबरोबरच सोशल डिस्टन्स पाळणे, हात धुणे आणि मास्कचा वापर आवश्यक आहे.

मुंबई: सणासुदीच्या काळात नागरिकांच्या भेटीगाठी होत असल्याने कोरोनाचा प्रसार वाढत आहे. लॉकडाऊन खुले होत असल्याने मुंबईकरांवर आणखी निर्बंध घालणे शक्य नसल्याने विना मास्क फिरणाऱ्या लोकांवरील कारवाई तीव्र करण्यात आली. सोमवारपासून दररोज अशा २० हजार लोकांना दंड करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. ही कारवाई पुढील महिनाभर सुरू राहणार असून आयुक्त इकबाल सिंह चहल स्वतः दररोज या मोहिमेचा आढावा घेणार आहेत.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अन्य उपाय योजनांबरोबरच सोशल डिस्टन्स पाळणे, हात धुणे आणि मास्कचा वापर आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क न लावणाऱ्या लोकांना महापालिकेने एप्रिल महिन्यापासून दंड ठोठावण्यास सुरुवात केली. सुरुवातीला एक हजार रुपये असलेली दंडाची रक्कम सप्टेंबर महिन्यापासून दोनशे रुपये करण्यात आली. मात्र अनेक ठिकाणी लोकं तोंडाला मास्क न लावताच फिरताना दिसत आहेत. त्यामुळे सोमवारपासून ही कारवाई तीव्र करण्यात आली आहे.

मास्क न लावणाऱ्यांना टॅक्सी, बस, कार्यालय, आस्थापना, सोसायटी अशा सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारण्याचा नियम महापालिकेने केला आहे. एप्रिलपासून आतापर्यंत महापालिकेने २० हजारांहून अधिक नागरिकांवर कारवाई करून ६० लाख रुपये दंड वसूल केला आहे. कोरोनावर प्रभावी ठरणारी लस बाजारात येईपर्यंत मुंबईकरांना अशीच खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क लावूनच बाहेर पडावे, असे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केले आहे. कांदिवली, बोरवली, चेंबूर या परिसरात मास्क न लावणाऱ्या लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. सध्या याच विभागांमध्ये रुग्णांचे प्रमाणही अधिक असल्याचे दिसून येत आहे.

लॉकडाऊन खुले केल्यानंतर मास्क न लावता फिरणारे नागरिक अनेक ठिकाणी दिसून येत आहेत. यामुळे भविष्यात अधिक धोका असल्याने तोंडाला मास्क न लावता फिरणार्‍या २० हजार लोकांना दररोज दंड करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागावे आणि मास्कचा वापर करावा.- इकबाल सिंह चहल( महापालिका आयुक्त)

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईमुंबई महानगरपालिका