Join us

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यापासून ठाकरेंना रोखणार? शिवाजी पार्क मैदान ‘फ्रीज’ केले जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2022 12:58 PM

शिवाजी पार्कवरील मेळाव्यासाठीची परवानगी आधी ठाकरे गटाने मागितलेली होती. आधी आलेल्यास परवानगी अशी भूमिका महापालिकेने घेतली तर त्यास विरोध करायचा आणि दोघांनाही परवानगी देऊ नका, अशी भूमिका शिंदे गटाकडून घेतली जाऊ शकते.

मुंबई : शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा घेण्यापासून कोणत्याही परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रोखण्याची रणनीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने आखली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्या अंतर्गत शिवाजी पार्क ‘फ्रीज’ केले जाण्याची शक्यता आहे. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठीचा अर्ज महापालिकेकडे केला आहे. त्यावर महापालिकेने निर्णय घेतलेला नाही. शिवाजी पार्कवरून राजकीय वाद नको, अशी भूमिका घेत महापालिकेने उद्या या दोघांनाही परवानगी नाकारली तर बीकेसीतील मैदानाचा पर्याय शिंदे गटाने खुला ठेवला आहे. 

काय होऊ शकते? -शिवाजी पार्कवरील मेळाव्यासाठीची परवानगी आधी ठाकरे गटाने मागितलेली होती. आधी आलेल्यास परवानगी अशी भूमिका महापालिकेने घेतली तर त्यास विरोध करायचा आणि दोघांनाही परवानगी देऊ नका, अशी भूमिका शिंदे गटाकडून घेतली जाऊ शकते.

शिंदे गटाचा ‘प्लॅन बी’देखील तयार -शिवाजी पार्कवरच मेळावा होईल यासाठी सर्व ताकद पणाला लावायची; पण पालिकेने वा न्यायालयाने नाकारले तर ‘प्लॅन बी’ म्हणून बीकेसीतील मैदानाचा पर्याय शिंदे गटाने खुला ठेवला आहे. महापालिकेने परवानगी नाकारली वा शिवाजी पार्क फ्रीज केले तर दोन्ही परिस्थितीत उच्च न्यायालयात ठाकरे गट धाव घेईल आणि मग न्यायालयातून फैसला होऊ शकेल. आपला मेळावा शिवाजी पार्कवर झाला नाही तरी चालेल पण कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यापासून रोखण्यावर शिंदे गटाचा भर दिसत आहे.

पाच दशकांचे नाते तोडण्याची रणनीती -महापालिकेने दोघांनाही परवानगी नाकारून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क ‘फ्रीज’ केले तरी शिंदे गटाला राजकीय यशच मिळेल. कारण, त्या परिस्थितीत उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेऊ शकणार नाहीत आणि ठाकरे आणि शिवाजी पार्कचा दसरा मेळावा हे पाच दशकांहून अधिक काळापासूनचे नाते तोडता येईल. शिवसेनेचे ४० आमदार, १२ खासदारांनी बंड केले. अनेक जिल्ह्यांमध्येही शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच होत असलेला ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होऊ द्यायचा नाही, अशी रणनीती शिंदे गटाने आखली आहे. 

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेदसरा