ठाकरे गटाकडून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदही जाणार? राष्ट्रवादी दावा सांगणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 08:46 AM2023-06-20T08:46:57+5:302023-06-20T08:47:09+5:30
कायंदे यांच्या पक्षांतरामुळे ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील संख्याबळ कमी झाले आहे.
मुंबई : विधान परिषद आमदार मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केल्यामुळे या गटाच्या संख्याबळावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे ठाकरे गटाला समर्थन असलेल्या विधान परिषद आमदारांची संख्या ९ वर आल्याने तेवढेच (९) संख्याबळ असलेला राष्ट्रवादी पक्ष विरोधी पक्षनेतेपदावर दावा कारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांचे पद धोक्यात आल्याची चर्चा आहे.
कायंदे यांच्या पक्षांतरामुळे ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील संख्याबळ कमी झाले आहे. आगोदर विप्लव बजौरिया आणि आता मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची ताकद विधानपरिषदेत समसमान झाली आहे.
ठाकरे गटाच्या नीलम गोऱ्हे या उपसभापती असल्याने विरोधी पक्षनेतेपद आणि उपसभापतिपद दोन्ही ठाकरे गटाकडे आहे.
परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगू शकतो. दुसऱ्या बाजूला काँग्रेसही सत्तेत वाटा मागू शकते. कारण, महाविकास आघाडीच्या रूपात पाहायचे तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे किमान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद तरी आपल्याकडे असावे, असे काँग्रेसला वाटू शकते. त्यामुळे मविआ यातून काय तोडगा काढते याबाबत उत्सुकता आहे.
निश्चितपणे विचार करू : अजित पवार
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार का, असा सवाल पत्रकारांनी केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार स्मितहास्य करत म्हणाले, तुम्ही हे आमच्या लक्षात आणून दिल्यामुळे आम्ही निश्चितपणे यावर विचार करू.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करीत कायंदे यांना पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आल्याचे जाहीर केले. महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, असेही शिंदे यांनी नमूद केले आहे.
४० कोटींची कुठली तरी फाईल बाहेर आली म्हणून मनीषा कायंदे गेल्या, असं मी व्यासपीठावर ऐकलं. हे लोक येतात कुठून, जातात कसे हा संशोधनाचा विषय आहे.
- खा. संजय राऊत, ठाकरे गट