ठाकरे बंधू एकत्र येणार?; राज ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंनीही दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 07:31 PM2021-06-05T19:31:06+5:302021-06-05T19:41:03+5:30
ठाकरे बंधू एकत्र येणार का?, असं विचारलं असता राज ठाकरे यांनी 'परमेश्वरास ठाऊक' अशा दोनच शब्दांत उत्तर दिलं होतं.
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांना एका वेबिनारमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का?, असं विचारलं असता राज ठाकरे यांनी 'परमेश्वरास ठाऊक' अशा दोनच शब्दांत उत्तर दिलं होतं. आत्ता सध्याचा काळ पाहता या प्रश्नांची उत्तरं नाहीत. इतर कुणाकडेही असतील असं वाटत नाही, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं होतं. राज ठाकरेंच्या या विधानानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील भाष्य केलं आहे.
एका वेबिनारमध्ये उद्धव ठाकरे यांना शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का?, असा सवाल विचारण्यात आला. यावर देशासाठी आणि राज्यासाठी जे एकत्र येऊ शकतात, त्यांनी आताच्या घडीला एकत्र यावं, सध्या देशात जे संकट आहे ते काही साधं नाही. या परिस्थितीला योग्यप्रकारे सामोरं गेलो नाही तर देशात अराजक येईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
माझी प्राथमिकता जीव वाचवण्याला आहे, घरचा कर्ता पुरुष गेला तर अर्थचक्राला काय अर्थ?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. यासोबतच माझं म्हणणं आहे जे जे या विचारासाठी एकत्र येऊ शकतात, त्यांनी एकत्र यायला हवं, राजकारण थांबवावं, असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. तसेच ज्या गोष्टी परमेश्वरला माहिती आहे. त्या मला माहिती असणं शक्य नाही, असं मिश्किल भाष्य उद्धव ठाकरे देखील यांनी केलं.
दरम्यान, राज ठाकरेंच्या विधानावरुन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही भाष्य केलं होतं. परमेश्वर हा कुठल्याही पक्षाचा मेंबर नसतो, तो कधीच मध्यस्थाची भूमिका घेत नाही. त्यामुळे अशा गोष्टी या परमेश्वरावर सोडून द्यायच्या नसतात. जो परमेश्वरावर विसंबून राजकारण करतो त्याला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
शिवसेना अन् भाजपा पुन्हा एकत्र येणार का?
पुन्हा भाजपा-तुम्ही एकत्र येणार किंवा भाजप -राष्ट्रवादी एकत्र येणार अशा अफवा उठतात, तर या अफवाच आहेत का?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर कुरघोड्या असत्या तर हे सरकार चाललंच नसतं. स्थापन झालं तेव्हा मी नवखाच होतो, पण आम्ही एकमताने एकत्र आलो, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकत्र येणार की नाही, असा सवाल विचारल्यानंतर त्याचं उत्तर दोन्ही पक्ष वेगळे का झाले यामध्ये आहे. एका विचाराने झालेली युती तुटली का, याचं उत्तर शोधावं लागेल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आमची युतीबाहेर पडण्याची इच्छा नव्हती-
आमची युतीबाहेर पडण्याची इच्छा नव्हती. आमची युती २५ ते ३० वर्ष होती. आम्ही एका ध्येयाने एकत्र राहिलो. मात्र आम्ही जे केलं ते प्रामाणिकपणे केलं, असं सांगायला उद्धव ठाकरे विसरले नाही. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्याशी आमचे कौटुंबिक नातेसंबंध होते. पंतप्रधानांशी देखील जे आमचे वैयक्तिक नातेसंबंध आहेत, असं सांगत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवावं. वैयक्तिक संबंध वेगळे ठेवावेत, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं आहे.
शिवसेना अन् भाजपा पुन्हा एकत्र येणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं! https://t.co/KoBhJhLiht@ShivSena@BJP4Maharashtra
— Lokmat (@MiLOKMAT) June 5, 2021