मंत्रिपदे, खातेवाटपाचा तिढा सुटणार? शपथविधीची आझाद मैदानावर तयारी; भाजपची उद्या नेता निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 04:56 AM2024-12-03T04:56:53+5:302024-12-03T04:57:13+5:30

आजारी एकनाथ शिंदेंच्या भेटीला गिरीश महाजन; तासभर चर्चा, आज तोडगा?

Will the crisis of ministerial posts, account allocation be resolved? Preparations for swearing-in at Azad Maidan; BJP leader selection tomorrow | मंत्रिपदे, खातेवाटपाचा तिढा सुटणार? शपथविधीची आझाद मैदानावर तयारी; भाजपची उद्या नेता निवड

मंत्रिपदे, खातेवाटपाचा तिढा सुटणार? शपथविधीची आझाद मैदानावर तयारी; भाजपची उद्या नेता निवड

मुंबई : भाजपच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा शपथविधी ५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता होणार असल्याने आता हालचालींना प्रचंड वेग आला आहे. भाजप आमदारांची विधिमंडळ नेता निवडण्यासाठी ४ डिसेंबरला सकाळी १० वाजता बैठक होणार आहे. मात्र, महायुतीत मंत्रिपदांचे व खात्यांचे वाटप याबाबतचा तिढा कायम असला तरी देवेंद्र फडणवीस यांचे दूत म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी रात्री ठाण्यात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी तासभर चर्चा केली. त्यामुळे कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी समारंभाच्या पूर्वतयारीचा आढावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर व देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी घेतला. अजित पवार गटाचे नेतेही यावेळी हजर होते. मात्र, शिंदेसेनेचा एकही नेता नव्हता. एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील निवासस्थानी आराम केला. गृह, महसूल व नगरविकास खाते तसेच विधानसभेचे अध्यक्षपद शिंदेसेनेला हवे आहे. भाजप गृह व महसूल खाते द्यायला तयार नाही.   मुख्यमंत्रीपुत्र खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मी उपमुख्यमंत्री होणार असल्याचे वृत्त निराधार असल्याचे ‘एक्स’वर स्पष्ट केले.

शपथविधीची आझाद मैदानावर तयारी; भाजपची उद्या नेता निवड

भाजपने निरीक्षक नेमले

भाजप विधिमंडळ पक्षाचा नवा नेता निवडण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता केंद्रीय भाजपने केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना निरीक्षक नेमले आहे. ते मंगळवारी मुंबईत पोहोचतील.

बुधवारी सकाळी १० ला विधानभवनात भाजपच्या आमदारांची बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड होईल, हे निश्चित मानले जात आहे. या निवडीनंतर मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत राज्यपालांची भेट घेऊन फडणवीस सरकार स्थापनेचा दावा करतील.

काय आहेत शक्यता?

महायुतीमध्ये शिंदेसेनेला १२ ते १३ तर अजित पवार गटाला आठ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. भाजपला २२ ते २३ मंत्रिपदे मिळतील असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद घ्यावे असा त्यांच्या पक्षातील सर्व आमदारांचा आग्रह आहे तो ते स्वीकारतील अशी दाट शक्यता आहे. विधानसभेचे अध्यक्षपद भाजपला, उपाध्यक्षपद अजित पवार गटाला, विधान परिषदेचे सभापतीपद शिंदेसेनेला तर उपसभापतीपद भाजपला दिले जाऊ शकते.

मुंबईत ७, तर नागपुरात १६ पासून अधिवेशन

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन ७, ८ व ९ डिसेंबरला मुंबईत होईल. तीन दिवसांत विधानसभेच्या नवीन आमदारांचा शपथविधी होईल. विधानसभा अध्यक्षांची निवड होईल आणि राज्यपालांचे अभिभाषण होईल. ७ व ८ ला फक्त विधानसभागृह भरेल. ९ ला दोन्ही सभागृहांचे कामकाज होईल. नागपूरचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरला सुरू होईल ते २१ डिसेंबरपर्यंत चालेल अशी शक्यता आहे.

शिंदेसेनेच्या आमदारांची बैठक रद्द

nएकनाथ शिंदे हे आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक सोमवारी घेणार होते, पण ताप व थ्रोट इन्फेक्शन झाल्याने त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या  बैठकीसह सर्व बैठका त्यांनी रद्द केल्या.

nमाजी मंत्री दीपक केसरकर यांनी शिंदेसेना मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही या वृत्ताचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला. शिंदे आणि आमच्या पक्षाला योग्य तो सन्मान मिळावा हीच आमची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.

‘सागर’वर गर्दी

nभाजपचे अनेक दिग्गज नेते, मंत्री यांनी सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर एकच गर्दी केली.

nप्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी ५ डिसेंबरच्या शपथविधी समारंभाच्या पूर्वतयारीबाबत त्यांच्याशी चर्चा केली.

मोदींसह अनेक मोठे नेते येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि मित्रपक्षशासित विविध राज्यांचे मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री, विविध धार्मिक, आध्यात्मिक संत, गुरू शपथविधी समारंभाला येणार आहेत. विविध देशांचे कौन्सुलेट जनरलही उपस्थित असतील. राज्यभरातून भाजप आणि मित्रपक्षांचे हजारो कार्यकर्ते येणार आहेत. त्या दृष्टीने सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

शाह यांच्यासोबत बैठकीनंतर एकत्रित चर्चा नाहीच

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी शिंदे-फडणवीस-अजित पवार यांनी गेल्या गुरुवारी दिल्लीत चर्चा केली होती. तिन्ही नेत्यांनी आता मुंबईत भेटावे आणि मंत्रिपदांचे व खात्यांचे वाटप याबाबत निर्णय करावा असे ठरले होते. मात्र, मुंबईत अशी बैठक होऊ शकलेली नाही. आता उद्या, मंगळवारी मंत्रिपद वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.

अजित पवार दिल्लीत

नवी दिल्ली : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार, असे बोलले जात होते. मात्र, शाह चंदीगडला एका कार्यक्रमासाठी निघून गेले. त्याआधी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या घरी अजित पवार, सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांच्यात बराच वेळ चर्चा झाली.

एकनाथ शिंदे आजारी आहेत, त्यांना सलाईन लागलेले आहे. मी आज त्यांच्याशी चर्चा केली. उद्यापासून ते सक्रिय होतील. आमच्यात कोणतेही मतभेद, नाराजी नाही. महायुती घट्ट आहे.

- गिरीश महाजन, माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते.

 

Web Title: Will the crisis of ministerial posts, account allocation be resolved? Preparations for swearing-in at Azad Maidan; BJP leader selection tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.