Join us

‘वॉटर टॅक्सी’च्या उद्घाटनाने उधळणार निवडणुकीचा गुलाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 9:29 AM

मुहूर्त फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर; केंद्राकडून आला निरोप

सुहास शेलारमुंबई : बहुप्रतीक्षित ‘वॉटर टॅक्सी’च्या उद्घाटनाने मुंबई पालिका निवडणुकीचा गुलाल उधळण्याचे नियोजन असून, हा कार्यक्रम फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निरोप केंद्राकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना आणखी काही काळ या सेवेची प्रतीक्षा करावी लागेल.

नवी मुंबईला दक्षिण मुंबईशी जलमार्गाने जोडणाऱ्या वॉटर टॅक्सी प्रकल्पाचे काम डिसेंबरअखेरीस पूर्ण झाले. जानेवारीत या सेवेचा शुभारंभ करून प्रवाशांना नववर्षाचे गिफ्ट देण्याचा महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, सिडको व मुंबई पोर्ट ट्रस्टचा मानस होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी कार्यक्रमाची आखणीही करण्यात आली. आता हा कार्यक्रम फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निरोप केंद्राकडून आल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.मुंबईतील मेट्रो प्रकल्प व अन्य विकासकामांच्या उद्घाटनाचा नारळ फोडून प्रचाराचा धुरळा उडवण्याची तयारी सत्ताधारी शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी केली आहे. मात्र, भाजपच्या हातात इतका मोठा कार्यक्रम सध्या नाही. त्यामुळे वॉटर टॅक्सी प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबई व नवी मुंबईकर मतदारांना सामोरे जाण्याचे नियोजन केले जात आहे. नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र व राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत फेब्रुवारीत हा कार्यक्रम होईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

कोणत्या मार्गावर सेवा?देशांतर्गत क्रूझ टर्मिनल ते बेलापूर, नेरूळ, ऐरोली, जेएनपीटी, रेवस, करंजाडे, धरमतर, एलिफंटा या मार्गावर वॉटर टॅक्सी धावणार आहे. त्याचा परवाना मिळवलेल्या इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेसने ४ हाय स्पीड बोटींसह ट्रायल रन सुरू केली आहे. अनुक्रमे ५०, ४०, ३२ आणि १४ इतकी या बोटींची आसनक्षमता आहे. या सेवेला वॉटर टॅक्सी न म्हणता वॉटर मेट्रो असे नाव देण्याचा प्रस्ताव आहे. 

टॅग्स :निवडणूकमुंबईगोवा