Join us  

ओबीसींचे आरक्षण काढून मराठ्यांना देणार का? भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे महाविकास आघाडीला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 7:42 AM

भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे हे बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ओबीसींच्या आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देणार का, महाविकास आघाडीच्या हे नेत्यांनी जाहीर करावे तसेच आपल्या विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात आघाडीने लेखी आश्वासन द्यावे, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिले.

भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे हे बोलत होते. बावनकुळे म्हणाले की, 'मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे, पण ते ओबीसींचे नुकसान करून नाही, अशी भाजपची स्पष्ट भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयातही टिकले होते. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री असताना हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवता आले नाही. महाविकास आघाडीने आरक्षणाबाबत नेहमीच दुटप्पी भूमिका घेतली आहे.

३१ खासदारांनी जाहीर करावेओबीसी समाजाचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण देऊ, हे महाविकास आघाडीने जाहीर करावे. महाविकास आघाडीच्या ३१ खासदारांनी ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला देऊ हे जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी दिले.

पुण्यात आज अधिवेशनपुणे येथे रविवारी होणाऱ्या प्रदेश भाजपच्या अधिवेशनाला उपस्थित ५३०० कार्यकर्ते, नेत्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आदी मार्गदर्शन करतील. या अधिवेशनातून नवी ऊर्जा घेऊन प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी केंद्र आणि राज्याच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवेल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.

टॅग्स :चंद्रशेखर बावनकुळेभाजपा