Join us  

ताजा विषय: दहावी, बारावी परीक्षेचा सावळा गोंधळ थांबणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 7:55 AM

एवढा गोंधळ कमी म्हणून की काय दहावी-बारावी परीक्षेत आता आयत्या वेळी प्रश्नपत्रिका मिळणार, ही बातमी येऊन धडकली

योगेश बिडवई

दहावी आणि बारावीच्या परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. बारावीची परीक्षा आठ दिवसांवर आहे. दहावीचीपरीक्षा २ मार्चपासून सुरू होत आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मात्र विद्यार्थ्यांची वेगळीच परीक्षा घेऊ पाहत आहे. दहावी परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांच्या हातात पडले आणि त्यावरून हिंदी की इंग्रजी विषयाचा पेपर आधी होणार? हा प्रथमदर्शनी प्रश्न विद्यार्थ्यांना पडला. कोणतेही वेळापत्रक हे तारखेनुसार दिले जाते, ही साधी गोष्ट बोर्डाला समजू नये का? इंग्रजीचा ८ तारखेचा पेपर आधी आणि त्यानंतर हिंदीचा ६ तारखेचा, असा क्रम छापण्यात आला. मुलं अभ्यास करताना उद्या कोणता पेपर आहे, हे पाहतात. बरं त्यावर बोर्डाने खुलासा काय द्यावा? म्हणे सांकेतांक क्रमांकानुसार विषयांचा क्रम दिला आहे. वेळापत्रकावरील विषय पाहा. हे म्हणजे आधीच तणावात असलेल्या विद्यार्थी व पालकांना गोंधळ वाढवण्याचाच प्रकार आहे. 

एवढा गोंधळ कमी म्हणून की काय दहावी-बारावी परीक्षेत आता आयत्या वेळी प्रश्नपत्रिका मिळणार, ही बातमी येऊन धडकली. याआधी पेपर सुरू होण्याच्या १० मिनिटांपूर्वी प्रश्नपत्रिका दिली जात होती. यंदापासून परीक्षेत ही पद्धत बंद करण्याचा जणू फतवाच परीक्षा मंडळाने काढला. कारण काय तर परीक्षा कालावधीत प्रश्नपत्रिका मोबाईल आणि सोशल मीडियावर व्हायरल होतात, असे निदर्शनास आले आहे. नवा निर्णय पेपरफुटीच्या अफवांना प्रतिबंध घालणे तसेच भयमुक्त वातावरणात परीक्षा व्हाव्यात, या उदात्त हेतू घेतल्याचे सांगण्यासही मंडळ विसरले नाही. या निर्णयाने विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा आला नाही तर नवल. 

मुळात दहावी बोर्डाची परीक्षा देताना विद्यार्थी काहीसे धास्तावलेले असतात. प्रश्न नीट समजून घेणे, त्याचे उत्तर साधारणपणे कसे लिहावे? त्यात काय मुद्दे असावे? हे सर्वच विद्यार्थ्यांना कळत नाही. प्रश्नपत्रिका समजून घेण्यासाठी हे १० मिनिटे अतिरिक्त असतात. त्यामुळे परीक्षार्थींचा ताण हलका होतो. हे सर्व मुद्दे शिक्षणतज्ज्ञांनी विचारात घेऊनच काही नियम केले होते. महामुंबई परिसरातील महापालिका शाळा तसेच मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये छोट्या गावांतूनही मुले शिकण्यासाठी येतात. त्यांचे पालक फारसे शिकलेले नसतात. शाळेव्यतिरिक्त मुलांना वेगळे मार्गदर्शन मिळत नाही. कोरोनामुळे दोन वर्षे प्रत्यक्ष शाळाच भरली नाही. अनेक विषयांत ही मुले कच्ची होती. वर्षभरात त्यांनी अभ्यासाची बरीचशी कसर भरून काढली. मात्र तरीही बोर्डाची पहिलीच परीक्षा देणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक असतेच, याचा बोर्डातील संवेदनशील सदस्यांनी विचार करण्याची गरज आहे.

कोकण आयुक्तांचे कॉपीमुक्त अभियानएकीकडे बोर्ड कॉपीमुक्त अभियानाची स्वतःची जबाबदारी झटकत असताना कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी कोकण विभागात कॉपीमुक्त अभियान राबवायचे ठरविले आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी ते स्थानिक स्तरावरील सरपंचांपर्यंत सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या या आवाहनाचे स्वागत होत आहे. विद्यार्थी, पालक, संस्थाचालकांचे उद्बोधन करण्यात येणार आहे. त्यातून कॉपीमुक्तीच्या दिशेने पाऊल टाकण्यात येत आहे. 

(लेखक मुंबई लोकमत आवृत्तीमध्ये मुख्य उपसंपादक आहेत)

 

टॅग्स :परीक्षादहावी12वी परीक्षा