मुंबई - राज्याची वाहिनी, गोरगरिबांची लालपरी गेली पाच महिन्यांपासून बंद असल्याने सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत. अद्यापही कोणताही निर्णय न होता एसटीचे आंदोलन सुरूच आहे. परिवहनमंत्री, एसटी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रयत्न करूनसुद्धा त्याला मार्ग निघाला नाही. न्यायालयीन लढाई सुरू असतानाच सरकार वारंवार एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे बजावत आहे. आता उच्च न्यायालयानेही कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासंदर्भात सांगितले आहे.
एसटी महामंडळाचे विलीनीकरण शक्य नाही. तसेच महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये समावेश करणे शक्य नाही, या शिफारशीसह उच्च न्यायालयाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने केलेल्या अन्य शिफारशी मंत्रिमंडळाने स्वीकारल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली. त्यावर, महामंडळाने याचिका दाखल केली आणि न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केला. समिती नेमली, दोन्ही पक्षांचे हित लक्षात घेऊन आम्ही आदेश देऊ. तत्पूर्वी आम्हाला कामगारांच्या वकिलांचे म्हणणे ऐकायचे आहे,’ असे न्यायालयाने मंगळवारी म्हटले होते.
आता न्यायालयाने कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे सूचवले आहे. ST महामंडळाच्या संपकऱ्यांनी १५ दिवसांत कामावर रुजू व्हावे, अन्यथा राज्य सरकार कायद्याप्रमाणे कारवाई करण्यास मोकळे असल्याचे उच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत स्पष्ट केले. तसेच, कामावर रुजू झालेल्या संपकऱ्यांवर महामंडळाने बडतर्फी किंवा अन्य कोणतीही कारवाई करू नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
दरम्यान, कामावर रुजू न झाल्यास कोणती कारवाई करणार याबाबत अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून उद्या निर्णय घेऊ, असे महामंडळाच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर, याचिकेवरील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे. त्यामुळे, आता लवकरच एसटी महामंडळाचा संप मिटणार असल्याची शक्यता दिसून येत आहे. काय म्हणतात कर्मचारी
राज्य सरकारने एसटी महामंडळाचे विलगीकरण शक्य नाही म्हटले आहे, पण सातवा वेतन आयोग किंवा आणखी पगारवाढ देऊन कारवाई मागे घेतल्यास कर्मचारी कामावर रुजू होतील, असे संपकरी कर्मचाऱ्याने सांगितले. गेल्या पाच महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे, पण अजूनही न्याय मिळाला नाही. आता तर एसटी महामंडळ याचिका मागे घेणार आहे. त्यामुळे आंदोलनात काही अर्थ नाही. आंदोलन सोडून आम्ही पुन्हा कामावर जाणार आहोत, प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांमधून व्यक्त करण्यात आली.