तिकीट कापणार की मतदारसंघ बदलणार? आमदारांना भीती; उत्तर मुंबईत भाजपमधील इच्छुकांमध्ये अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 08:26 AM2024-08-09T08:26:43+5:302024-08-09T08:29:37+5:30

यातील दहिसर आणि बोरिवली मतदारसंघातील आमदारांची उमेदवारी कापली जाण्याची भीती आहे.

Will the ticket be cut or will the constituency be changed? Legislators fear; Restlessness among BJP aspirants in North Mumbai | तिकीट कापणार की मतदारसंघ बदलणार? आमदारांना भीती; उत्तर मुंबईत भाजपमधील इच्छुकांमध्ये अस्वस्थता

तिकीट कापणार की मतदारसंघ बदलणार? आमदारांना भीती; उत्तर मुंबईत भाजपमधील इच्छुकांमध्ये अस्वस्थता

दीपक भातुसे - 

मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपमध्ये सध्या अस्वस्थतेचे वातावरण आहे. विद्यमान आमदारांना उमेदवारी जाण्याची किंवा मतदारसंघ बदलला जाण्याची भीती आहे. उत्तर मुंबईतील सहा मतदारसंघांपैकी चार विधानसभा मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. यात दहिसरमधून मनीषा चौधरी, बोरिवलीतून सुनील राणे, कांदिवली पूर्वेतून अतुल भातखळकर आणि चारकोपमध्ये योगेश सागर हे भाजपचे आमदार आहेत. यातील दहिसर आणि बोरिवली मतदारसंघातील आमदारांची उमेदवारी कापली जाण्याची भीती आहे.

दहिसर आणि बोरिवली येथून गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये तणावाचे वातावरण आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांना विधानसभा निवडणूक लढवायची असल्याचे समजते. यापूर्वी ते उत्तर मुंबईतीलच मागाठाणे विधानसभा मतदारसंघातून मनसेकडून २००९ साली विधानसभेवर निवडून गेले होते. भाजपत प्रवेश केल्यानंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली; पण लोकांमधून निवडून येण्याची त्यांची इच्छा असल्याने ते दहिसर किंवा बोरिवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे भाजपमधील सूत्रांकडून सांगण्यात आले. दहिसरला मनीषा चौधरी या आमदार आहेत. वय आणि प्रकृतीचे कारण सांगून त्यांना तिकीट नाकारले जाणार, अशी चर्चा आहे. दुसरीकडे बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांचा मतदारसंघ बदलला जाण्याची चर्चा आहे. २०१९ला ते बोरिवली मतदारसंघातून आमदार झाले, त्यापूर्वी त्यांनी वरळी मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवली होती; पण तिथे त्यांना यश आले नव्हते.

गोपाळ शेट्टीही इच्छुक?
-     लोकसभेला गोपाळ शेट्टी यांना खासदारकीचे तिकीट नाकरण्यात आले. त्यानंतरही त्यांनी पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे निवडणुकीत काम केले. 
-     आता शेट्टी बोरिवलीतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. येथील पदाधिकारीही शेट्टींना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते. 
-     सुनील राणे यांना बोरिवलीऐवजी वरळीतून उमेदवारी देणार, या चर्चांना आता अर्थ नसल्याचे काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांना वरळीतून उमेदवारी द्यायची असती तर यापूर्वीच पक्षाने त्यांना तिथून तयारी करण्याच्या सूचना केल्या असत्या. आता निवडणुकीच्या तोंडावर पक्ष हा बदल करणार नाही, असे काही पदाधिकारी सांगत आहेत.

Web Title: Will the ticket be cut or will the constituency be changed? Legislators fear; Restlessness among BJP aspirants in North Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.