परिवहनसेवेचे खरेच ‘कल्याण’ होईल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2023 01:45 PM2023-06-05T13:45:25+5:302023-06-05T13:47:36+5:30
अनेक वर्षे भिवंडीसारख्या शहरात एसटी स्टँडपर्यंत केडीएमटीची बस जाऊ शकत नाही.
- मिलिंद बेल्हे
गेल्या २५ वर्षांत ढिसाळ कारभारामुळे कायम खड्ड्यात गेलेली कल्याण-डोंबिवली महापालिकेची परिवहन सेवा उल्हासनगर, भिवंडी या महापालिका आणि अंबरनाथ-बदलापूर नगरपालिकांतही परिवहन सेवा पुरवण्यास तयार आहे. जेव्हा मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन झाले तेव्हापासून या संपूर्ण महानगर क्षेत्रासाठी एकच परिवहन सेवा असावी, यासाठी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. पण, ज्याप्रमाणे बेस्ट, टीएमटी आणि एनएनएमटी व्यावसायिक पद्धतीने चालवल्या गेल्या, काळानुरूप बदलल्या, मार्गांचा व्यावसायिक विस्तार करत गेल्या ते कौशल्य केडीएमटीला कधीच दाखवता आले नाही.
अनेक वर्षे भिवंडीसारख्या शहरात एसटी स्टँडपर्यंत केडीएमटीची बस जाऊ शकत नाही. कारण रिक्षाचालकांचा विरोध, त्याला कोणीच आवर घालू शकलेले नाही. उल्हासनगर पालिकेला स्वतःची परिवहन सेवा सुरू करायची आहे. त्यासाठी नेमलेले सभापती दीर्घकाळ बसून आहेत. बसची खरेदी, चालक-वाहकांची भरती, दुरुस्ती-देखभालीच्या नावाखाली स्पेअर पार्टची खरेदी यात हात ओले करता यावे म्हणून अनेकांना आपापली परिवहन सेवा टिकवून ठेवायची आहे. पण, या आतबट्ट्याच्या खरेदीमुळे, कशाही केलेल्या भरतीमुळे, कंत्राटदारांवरील खैरातीमुळे बससेवा प्रचंड महाग बनत गेली. बेस्ट जी सेवा पाच रुपयांत देते, त्यासाठी चार ते पाचपट पैसे येथील प्रवाशांना मोजावे लागतात.
सध्याच्या परिवहन सेवा रेल्वे स्थानक केंद्रित आहेत. आता त्यासाठी मेट्रो स्टेशनचाही विचार करावा लागेल. पण, ज्या परिवहन सेवेला शहरातील वर्दळीच्या मार्गांचा, प्रवाशांच्या गरजांचा विचार कधी करता आला नाही; कल्याण असो की डोंबिवली ही शहरे पूर्णपणे बसने जोडता आली नाहीत, टिटवाळ्यासारख्या पालिकेच्या भागापर्यंत बससेवा देता आलेली नाही, त्यांनी आणखी दोन पालिका, दोन नगरपालिकांपर्यंत एकात्मिक सेवेसाठी उडी मारावी, हे प्रवाशांसाठी आश्चर्यकारक आहे.
मुख्यमंत्र्यांनी आग्रह धरल्यामुळे जर परिवहन सेवांचे एकत्रीकरण होणार असेल, तर त्यात बेस्ट, टीएमटी, एनएनएमटीएटी, केडीएमटी, एमबीएमटी, व्हीव्हीएमसी, एसटी या सर्वांचा समावेश झाला तरच ती सेवा एकात्मिक होईल. प्रमुख सेवांनीच अंग काढून घेतले तर पुन्हा हद्दीपासून अनेक प्रश्न निर्माण होतील आणि मुख्यमंत्र्यांचे स्वप्न कागदावरच राहील.
प्रशासनच दुबळे!
- रिक्षा संघटना ताब्यात असलेल्या राजकारण्याच्या हाती परिवहन सेवा सोपवली, की ती कशी भंगारात जाते, याचा वस्तुपाठच केडीएमटीने या काळात घालून दिला.
- बससाठी रस्ते रुंद करायचे आणि त्यावर फेरीवाले, रिक्षा संघटनांनी कब्जा करायचा, हे वर्षानुवर्षे चालत आले.
- डोंबिवलीसारख्या एका शहराच्या स्टेशन परिसरात बससेवेचा एकही थांबा नाही, पण वेगवेगळ्या रिक्षा संघटनांचे १६ ते १७ थांबे असतील, तर परिवहन सेवा- तिचे प्रशासन किती दुबळे आहे आणि हे निर्णय घ्यायला लावणारे नेते किती शिरजोर आहेत याची खात्री पटते.