चित्रपटगृहे सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 12:10 AM2020-04-17T00:10:01+5:302020-04-17T00:10:24+5:30
केंद्र सरकारने लॉकडाउनची मुदत ३ मे पर्यंत वाढविली असली तरी तो कालावधी आणखी वाढविला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या कालावधीत सर्व शिक्षणसंस्था
मुंबई : देशभरातील लॉकडाउनला मिळालेल्या मुदतवाढीमुळे हिंदी आणि मराठीसहित सर्वच भाषांमधील चित्रपटांचे चित्रीकरण जुलैपर्यंत सुरू होणार नाही, अशी चर्चा आहे. तसेच चित्रपटगृहेही आॅगस्ट किंवा सप्टेंबर अखेरपर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे चित्रपट उद्योगाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.
केंद्र सरकारने लॉकडाउनची मुदत ३ मे पर्यंत वाढविली असली तरी तो कालावधी आणखी वाढविला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या कालावधीत सर्व शिक्षणसंस्था, धार्मिक ठिकाणे, मनोरंजन उद्योग आदींवर काही निर्बंध लागू झाले आहेत. त्यानुसार सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. विनाकारण बाहेर न पडता शक्यतो घरातच थांबण्याच्या सूचना सरकारने नागरिकांना दिल्या आहेत.
देशात अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने वगळता अनेक उद्योग, कारखाने, आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. सर्वच भाषांमधील चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण थांबविण्यात आले असून चित्रपटगृहेही सध्या बंद आहेत.
चित्रपटसृष्टीतील सूत्रांनी सांगितले की, लॉकडाउनच्या पुढच्या टप्प्यात मर्यादित लोकांसह चित्रीकरणाला सरकार कदाचित परवानगी देईलही परंतु तसा निर्णय सध्यातरी दृष्टीपथात नाही. बिग बजेट चित्रपटांचा जामानिमाही खूप मोठा असतो. त्यामुळे अशा चित्रपटांचे चित्रीकरण लॉकडाउन संपूर्णपणे मागे घेतल्यानंतरच पूर्ण होऊ शकते.
कोरोना साथीमुळे बॉलिवूड व अन्य भाषांतील चित्रपटसृष्टींचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. ते कसे भरून निघणार याचीही चिंता या क्षेत्रातील धुरिणांना सतावत आहे. देशात हिंदी बरोबरच प्रादेशिक भाषांमध्येही मोठ्या प्रमाणात चित्रपट तयार होत असतात. या उद्योगावर अनेक व्यक्ती अवलंबून आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांची निर्मितीही मोठ्या प्रमाणात होत असते.
चित्रपटगृहे सुरू होण्याची प्रतीक्षा
संचारबंदीमुळे चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक येण्याची शक्यता अजिबात नाही. गर्दीच्या ठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग मोेठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. देशातील कोरोनाची साथ संपूर्णपणे ओसरल्यानंतरच चित्रपटगृहे, मॉल पुन्हा सुरू होऊ शकतील. त्यामुळे सर्वजण त्याची वाट पाहत आहेत.