मुंबई : राज्यातील सात सागरी जिल्ह्यांत लागू असलेला ६१ दिवसांचा मासेमारी बंदी कालावधी आज संपला असून, उद्यापासून (१ ऑगस्ट) नवा मासेमारी हंगाम सुरू होणार आहे. १ जून ते ३१ जुलै हा मासेमारी बंदी कालावधी मत्स्यव्यवसाय खात्याने घोषित केला होता. पश्चिम किनारपट्टी या पावसाळी कालखंडात वादळे आणि मत्स्यसंवर्धनासाठी बंद असते. हा हंगाम उद्यापासून सुरू होणार असला तरी मच्छीमारांच्या मनात मात्र धाकधूक कायम आहे. हंगाम सुरू झाला तरी भरपूर मासळी मिळेल, याबाबत संदिग्धता आहे. त्यामुळे ते चांगल्या मासेमारीसाठी सागराला साकडे घालताना दिसत आहेत.
‘परताव्याची रक्कम त्वरित द्या’सरकारने मच्छीमारांचा थकीत डिझेल परतावा एक रकमेने देण्याकरिता भरीव तरतूद केली आहे. परताव्याची रक्कम लवकरात लवकर मच्छीमारांना द्यावी, जेणेकरून चालू मासेमारी हंगामात मच्छीमारांना आर्थिक मदत होईल, अशी मागणी प्रदीप टपके यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.
साहित्यासह आर्थिक भांडवल आणायचे कुठून?बंदी कालावधीत होणारी मासेमारी, एलईडीचा बेकायदा वापर यामुळे समुद्रीय जैविक साखळी उद्ध्वस्त होते. असे असताना शासन संबंधितांवर कारवाई करत नाही. त्यामुळे माशांची पैदास होत नाही. सोसाट्याचा वारा आणि समुद्रात लाटांचे तांडव सुरू असण्याची शक्यता लक्षात घेता थोडी उसंत घेऊन दहा-पंधरा दिवस उशिराने मासेमारीसाठी निघण्याची बहुतांश मच्छीमारांची धारणा आहे. यंदा शेतीची कामे उशिराने सुरू झाल्यामुळे मच्छीमारी बोटीवर काम करण्याकरिता येणारा खलाशी वर्ग अजून उपलब्ध झाला नाही. मासेमारीकरिता जाण्याअगोदर बोटींना लागणारे डिझेल, बर्फ, मासेमारी जाळी व इतर मच्छीमारी साधनांकरिता लागणारे फार मोठे आर्थिक भांडवल आणायचे कुठून, हा फार मोठा प्रश्न मच्छीमारांना सोडवायचा आहे, असा सवाल मच्छीमार नेते प्रदीप टपके यांनी उपस्थित केला आहे.