गणेशोत्सवासाठी कोकण प्रवास लुटीला लगाम लागणार का? एसटीच्या ३५०० पैकी ३२०० गाड्या आरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 08:18 AM2023-09-13T08:18:59+5:302023-09-13T08:19:17+5:30
ST Bus Booking: एसटीच्या साडेचार हजार गाड्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी असणार आहे. त्यामुळे खासगी बसचे तिकीट दर ‘जैसे थे’ आहेत. तरीही गणेशोत्सवासाठी कोकण प्रवाशांच्या लुटीला लगाम लागणार की ऐन गर्दीच्या वेळी त्यांची लूट सुरू होणार, असा सवालही प्रवासी विचारत आहेत.
मुंबई : गणेशोत्सवासाठी दरवर्षी लाखो चाकरमानी कोकणात जातात. काही रेल्वे, एसटीने तर काही खासगी वाहनाने जातात. चाकरमान्यांच्या संख्येचा विचार करता यंदा रेल्वेकडूून आतापर्यंत ३१२ फेऱ्यांची घोषणा केली आहे; पण सामान्यांना तिकीट मिळत नाही. तर गणेशोत्सव काळात खासगी बसने जाण्याशिवाय पर्याय नाही. बसचालक दुप्पट, तिप्पट भाडे आकारून प्रवाशांचा खिसा कापतात. एसटीच्या साडेचार हजार गाड्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी असणार आहे. त्यामुळे खासगी बसचे तिकीट दर ‘जैसे थे’ आहेत. तरीही गणेशोत्सवासाठी कोकण प्रवाशांच्या लुटीला लगाम लागणार की ऐन गर्दीच्या वेळी त्यांची लूट सुरू होणार, असा सवालही प्रवासी विचारत आहेत.
गणेशोत्सव काळात कोकणासह इतर जिल्ह्यांत जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी असते. कोकणात जाण्यासाठी शासनाकडून तसेच रेल्वे सुविधा ही असते, परंतु ऐनवेळी ही सुविधा मिळत नाही. त्यामुळे प्रवासीवर्गास खासगी बसने जावे लागते. मात्र, खासगी बसचालक या संधीचा फायदा घेत नेहमीपेक्षा अवाच्या सव्वा दराने पैशांची मागणी करतात. प्रवाशांनाही नाइलाजाने आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतो. एसटीच्या महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीमुळे प्रवासी वर्ग एसटीकडे वळला आहे. खासगी वाहतुकीला कमी प्रतिसाद असल्याने तूर्तास तरी तिकीट दर कमी आहे.
एसटीच्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीमुळे प्रवासीवर्ग एसटीकडे वळला आहे. खासगी वाहतुकीला कमी प्रतिसाद असल्याने तिकीट कमी आहे. ऐन गर्दीच्या वेळी भाडेवाढ केली जाऊ शकते.
- दीपक चव्हाण, गणेशभक्त, कोकण प्रवासी संघटना
आरटीओची असणार नजर
खासगी बसचालकांकडून गणेशोत्सवाच्या काळात होणारी चाकरमान्यांची लूट रोखण्यासाठी शहरातील महामार्गावर आरटीओचे पथक तैनात असणार आहे. तसेच प्रवाशांनीही असा लुटीचा अनुभव असल्यास तक्रार करावी, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.