कमी पैशांत घर होईल का? अव्वाच्या सव्वा भाव असल्याने सामान्य मुंबईकर नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 03:00 PM2023-06-14T15:00:38+5:302023-06-14T15:00:38+5:30
यावर्षी म्हाडाने सुमारे ४ हजार घरांची लॉटरी काढली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करणारे प्राधिकरण म्हणून म्हाडाकडे पाहिले जाते. मात्र, यावर्षी म्हाडाने सुमारे ४ हजार घरांची लॉटरी काढली आहे. त्यातील घरांचे भाव अव्वाच्या सव्वा असून, सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर ही घरे आहेत. परिणामी, म्हाडाच्या लॉटरीवर सर्वसामान्यांनी नाराजी व्यक्त केली असतानाच दुसरीकडे खासगी विकासकांकडून बांधली जाणारी घरे विकत घेण्याचे स्वप्नही मुंबईकर पाहू शकत नाहीत, अशी अवस्था आहे. त्यामुळे कमी पैशांत घराचे स्वप्न पूर्ण होईल का? असा सवाल करत आहेत.
सर्वांत महाग कुठे?- लोअर परळ, महालक्ष्मी, ताडदेव, वरळी अशा दक्षिण मुंबईसह दक्षिण मध्य मुंबईत सुरू असलेल्या प्रकल्पांमधील घरांच्या किमती या एक कोटीपासून अडीच कोटींपर्यंत आहेत. म्हाडाच्या घरांच्या किमतीच ७ कोटी आहेत.
स्वस्त घर मिळते का?- मुंबईत स्वस्तात घर मिळणे कठीण आहे. झोपड्या, चाळींमध्ये घरे असली तरी त्याचा दर्जा सुमार आहे. वन प्लस वन किंवा वन प्लस थ्री घरांची संख्या उपनगरात मोठी आहे. मात्र, या घरांच्या किमती ३० लाखांपासून ५० लाखांपर्यंत आहेत.
घराचा ताबा कधी मिळणार?- एखादा प्रकल्प सुरू असताना आणि एखादा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर घर घेतल्यानंतर किमतीमध्ये अव्वाच्या सव्वा फरक पडतो. मात्र, मुंबईत घर बुक केल्यापासून त्याचा ताबा मिळेपर्यंत म्हणजे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत विलंंब होत असल्याचे चित्र आहे.
कुठे आहे मागणी- मेट्रोमुळे पश्चिम उपनगर विकसित होत आहे. मात्र, विकास होत असल्याने घरांच्या किमती कोटींना हात घालत आहेत. चाळीत घरे असली तरी ३० ते ४० लाखांपासून घरांची किंमत सुरू होत आहे.
पुनर्विकास आणि घरघर- झोपड्या आणि चाळींचा पुनर्विकास होत असला तरी पुनर्विकासानंतरच्या प्रकल्पातही घर घेणे मुंबईकरांना परवडेनासे झाले आहे. बँकेचे कर्ज मिळविण्यापासून घरांची कागदपत्रे क्लिअर आहे की नाही हे तपासण्यात मुंबईकरांचा वेळ जातो.
अंडर कन्स्ट्रक्शन- मुंबई शहर आणि उपनगरांत नवीन प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, यातील बरीच कामे ही पुनर्विकासाशी निगडित आहेत. तर उर्वरित कामे धनाढ्य बिल्डरची असून, या प्रकल्पांतील घरांच्या किमती या कोट्यवधींच्या घरात आहेत.