‘सिनेट’साठी अवघ्या २७ हजार पदवीधरांची नोंदणी, कमी नोंदणी पडणार युवा सेनेच्या पथ्यावर?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 01:05 PM2023-12-01T13:05:40+5:302023-12-01T13:06:08+5:30
Mumbai News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कधी नव्हे इतक्या प्रतिष्ठेच्या झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अवघी २७ हजार मतदारांचीच नोंदणी झाली आहे. ही कमी नोंदणी ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या पथ्यावर पडणार असल्याची चर्चा आहे.
- रेश्मा शिवडेकर
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कधी नव्हे इतक्या प्रतिष्ठेच्या झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अवघी २७ हजार मतदारांचीच नोंदणी झाली आहे. ही कमी नोंदणी ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या पथ्यावर पडणार असल्याची चर्चा आहे.
गैरप्रकार टाळण्याच्या नावाखाली ओटीपीच्या आधारे, तीही केवळ ऑनलाइन नोंदणी करण्याच्या आग्रहामुळे पदवीधर मतदारांची नोंदणी करताना मनविसे, युवा सेना, छात्रभारती आदी विद्यार्थी संघटनांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. गुरुवारी सायंकाळी नोंदणीची मुदत संपली तेव्हा सुमारे २७ हजार पदवीधरांनी नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले. गेल्या २० वर्षांत तीन सिनेट निवडणुकांसाठी झालेल्या पदवीधरांच्या नोंदणीची आकडेवारी पाहता, ही सर्वात कमी नोंदणी आहे.
नकारात्मक संदेश नको म्हणून...
नोंदणीकरिता कागदपत्रे मिळवता येतात. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव ओटीपी देण्यास फारसे कुणी तयार होत नाही. परिणामी, ९० हजारांपैकी अवघ्या २५ ते २६ हजार मतदारांचीच नोंदणी होऊ शकली.
उर्वरित नव्याने नोंदणी झालेले आहेत. काहीही करून या निवडणुकीतील प्रस्थापितांची पिछेहाट व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी कुठल्याही प्रकारचा नकारात्मक संदेश जाऊ नये, यासाठी ही मोर्चेबांधणी असल्याची कुजबुज विद्यापीठ वर्तुळात सुरू आहे.
विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाच्या १० जागांवरील निवडणुकांवर युवा सेने खालोखाल मनविसेचा वरचष्मा राहिला आहे. यंदा शिवसेनेतील फाटाफुटीमुळे आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. राजकारणात आपले अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेले मनसेतील नवे युवा नेतृत्व पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरले आहे. त्यामुळे मनविसेही नोंदणी करण्यात आघाडीवर होती.