Join us

शिक्षक दिनापूर्वी शिक्षक होणार का संपूर्ण लसवंत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबईमुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शिक्षकांनाही लसीकरणात प्राधान्य देऊन शिक्षकांची लसीकरण व्यवस्था सुरळीत पार पाडावी, अशी मागणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शिक्षकांनाही लसीकरणात प्राधान्य देऊन शिक्षकांची लसीकरण व्यवस्था सुरळीत पार पाडावी, अशी मागणी शिक्षक करू लागले आहेत. शाळा सुरु करण्याआधी सगळ्यात महत्त्वाचा टप्पा शिक्षकांचे लसीकरण असून राज्य शासनाच्या आरोग्य व शिक्षण विभागाने समन्वय साधत ५ सप्टेंबरपूर्वी मुंबईच नाही तर, राज्यातील शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करावे अशी मागणी शिक्षक संघटना आणि मुख्याध्यापक यांच्याकडून होत आहे.

आगामी शिक्षक दिन ५ सप्टेंबरपूर्वी सर्व शाळांतील शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या लसींच्या व्यतिरिक्त २ कोटी लस उपलब्ध होणार असल्याची माहिती नुकतीच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा कार्यालयाकडून राज्यातील सर्व महानगरपालिका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना यासंदर्भात कळवलेले आहे. मुंबईतील ७० टक्के शिक्षक शिक्षकेतर लगतच्या ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील मनपा क्षेत्रात तसेच उपरोक्त जिल्ह्यातील नगरपालिका व ग्रामीण भागात राहतात. त्यानुसार शिक्षकांना त्यांच्या निवासस्थानाजवळील विधानसभा क्षेत्रातील लसीकरण केंद्रावर प्राधान्य द्यावे, अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे.

शाळा अद्यापही सुरु नसल्याने शिक्षक घरून ऑनलाईन वर्ग आणि शिकवण्या घेत आहेत. त्यामुळे शिक्षकांसाठी शक्यतो वेळेची लवचिकता असणारे स्वतंत्र लसीकरण केंद्र उपलब्ध झाल्यास त्यांची आणि शाळांच्या वेळात विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही असे, मत त्यांनी व्यक्त केले आहे.

या आधीचे नियोजन फसले

याआधी पहिल्या लॉकडाऊन दरम्यान शाळा सुरु करण्याच्या निमित्ताने शिक्षकांच्या लसीकरणाचा घाट घातला होता. पालिकेचे लसीकरणातील ढिसाळ व्यवस्थापन , शिक्षकांना नसणारा फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा, त्यांना लसीकरणात नसलेले प्राधान्य यामुळे ते लसीकरण वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. किमान यावेळी तरी शाळा सुरु करण्याच्या दृष्टीने शिक्षकांचे लसीकरण नियोजित पद्धतीने आणि वेळेत व्हावे अशी अपेक्षा शिक्षक व्यक्त करीत आहेत.