- मनीषा म्हात्रे
गेल्या ३० वर्षांपासून भाजपाने स्वत:कडे राखून ठेवलेला घाटकोपर पूर्व विधामसभेतील गडात पारंपरिक मतदार भाजपाला साथ देणार का? हे उमेदवार कोण असेल? यावर निश्चित होणार आहे. त्यात, काँग्रेसचे प्रवीण छेडा यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे या भागात भाजपाची पकड मजबूत होण्यास मदत होईल.कधीकाळी सेनेचा गड मानल्या जाणाऱ्या या भागात, भाजपा आमदार प्रकाश मेहता यांनी ३० वर्षे कमळ फुलविले. ते सलग सहाव्यांदा जिंकून आले. सध्या हा भाजपाचा बालेकिल्ला बनला आहे. सुमारे २ लाख ४५ हजार मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात गुजराती मतदार अधिक आहेत. पंतनगर, विद्याविहार, म्हाडा वसाहत, रमाबाई नगर, कामराजनगर, गारोडीयानगर, पोलीस वसाहत, छेडानगर अशा मोठ्या वसाहती या महत्त्वपूर्ण वस्ती या मतदार संघात आहेत. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न या मतदार संघात सर्वात महत्त्वाचा आहे, तसेच वाहतूक समस्येचाही प्रश्न नागरिकांना भेडसावतो आहे. ईशान्य मुंबईतील सर्वात मोठे पालिकेचे राजावाडी रुग्णालय याच मतदार संघात आहे. रुग्णांची संख्या वाढती असल्याने मनुष्यबळाबरोबरच सोईसुविधांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.मुंबईतील मोठा व्यापारी वर्ग या भागात राहतो. यात हिरे व्यापारी, सराफ, शेअर मार्केट, बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. तो भाजपाला आतापर्यंत पसंती देत असल्याचे दिसून आले. पालिका निवडणुकीत, भाजपाकडून कोट्यधीश पराग शहा रिंगणात होते. त्यांनी काँग्रेसकडून उभे असलेल्या प्रवीण छेडा यांना पराभवाचा धक्का दिला होता.२००९च्या विधानसभा निवडणुकीत मेहता यांनी काँग्रेसचे वीरेंद्र बक्षी यांचा पराभव करत, ४३ हजार ६०० मतांनी विजय मिळविला, तर २०१४ मध्ये मोदी लाटेत हाच आकडा ६७ हजारांवर पोहोचला. अटीतटीच्या या लढतीत काँग्रेसचे छेडा तिसऱ्या क्रमांकावर होतेसेनेच्या जगदिश शेट्टी यांनी २६ हजार ८८५ मते मिळविली. भाजपातून काँग्रेसमध्ये येऊन नगरसेवक झालेल्या छेडा यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला. त्यामुळे त्यांनी या भागात तयार केलेला काँग्रेसचा गट भाजपाच्या दिशेने वळू शकतो. याचा फायदा भाजपा उमेदवाराला होईल. गेल्या लढतीत रिपाइंही त्यांच्याबरोबर होती.यंदा मात्र ईशान्य मुंबईत रिपाइंच्या उमेदवाराला संधी मिळावी, म्हणून अंतर्गत चर्चा, बैठका झाल्या. त्यात रमाबाईनगरात बहुजन वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.मात्र, यातही वेगवेगळे गट असल्याने, एकालाच ती मते मिळत नाही. बहुजन विकास आघाडीचा उमेदवार येथील मते स्वत:कडे वळवू शकतो. तो उमेदवार कोण आणि कसा असेल? हे त्यावर ठरेल. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले आहे़राजकीय घडामोडीकाँग्रेसचे प्रवीण छेडा यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला. त्यामुळे छेडा यांनी तयार केलेली काँग्रेसची फळी भाजपाच्या दिशेने येऊ शकते. याची मदत या भागात भाजपाची ताकद वाढण्यास होईल.भाजपाचे ज्येष्ठ नेते भालचंद्र शिरसाट हे मराठी असले, तरी गुजराती मतदारांवर त्यांची पकड आहे. अनेक कायदेशीर आणि प्रशासकीय बाबींसाठी त्यांची मदत घेतली जाते. ते अनेक वर्षे प्रकाश मेहतांसोबत होते. अलीकडच्या काळात ते सोमय्यांसोबत आहेत.उमेदवारांमध्ये सगळ्यात श्रीमंत म्हणविल्या जाणाऱ्या विकासक पराग शहा आणि मेहतांमध्ये अंतर्गत धुसफुस सुरू आहे.दृष्टिक्षेपात राजकारणईशान्य मुंबईत भाजपाची पहिली यादी जाहिर झाली. त्यात अद्याप तरी सोमय्यांचे नाव जाहीर झालेले नाही. ईशान्य मुंबईत गुजराती उमेदवार असला, तर या भागातील गुजराती एकगठ्ठा मतदान त्यांना मिळू शकते. सोमय्यांबद्दलचा राग या भागात कायम आहे.याच गुजराती व्होट बँकवर मेहता ३० वर्षे निवडून आले. आमदारकीची त्यांची ही ६वी वेळ आहे. त्यामुळे उमेदवार कोण असेल? त्यावर येथील मतांचे विभाजन ठरणार आहे.२०१४च्या लोकसभा लढतीत घाटकोपर पूर्व विधानसभा क्षेत्रातून मोदी लाटेत भाजपा उमेदवाराला सर्वाधिक म्हणजेच ९६ हजार ०३८ मते मिळाली होती, तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला २३ हजार ५२४ मते मिळाली. मेधा पाटकर यांना १० हजार १४० मते होती. ईशान्य मुंबईतील ६ विधानसभा मतदार संघापैकी येथील आकडा जास्त होता.