मुंबईतील लोकलमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या पाहिली तर अंगावर काटा उभा राहतो. ७५ लाख प्रवासी वाहून नेणाऱ्या लोकलखाली दररोज ८-१० जीव नाहक जातात. अनेक उपाययोजना करण्याचे रेल्वेने ठरवूनही मृत्युपंथी जाणाऱ्यांची संख्या काहीकेल्या कमी झालेली नाही. अपघात झाल्यानंतर जखमीसाठी महत्त्वाचा असतो तो ‘गोल्डन अवर.’ अपघात घडल्यानंतर या पहिल्या तासात योग्य उपचार मिळाल्यास जीव गमावणाऱ्यांची संख्या घटण्यास मदत होऊ शकते. किंबहुना ही संख्या शून्यावर येणे महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे यांनी कोणत्या उपाययोजना आखल्या? या उपाययोजनांची सद्य:स्थिती काय आहे? अपघात रोखण्यासाठी कोणकोणते प्रयत्न होत आहेत, यावर दृष्टिक्षेप टाकणारा हा ‘लोकमत’चा स्पेशल रिपोर्ताज...मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर विविध अपघात होत आहेत. या अपघातांमुळे २०१५मध्ये जवळपास ३ हजार प्रवाशांना तर २०१४मध्ये ३ हजार ४२३ प्रवाशांना प्राण गमवावे लागले. अपघाताची तीव्रता अधिक असल्यास काही प्रवासी जागीच ठार होतात; तर काहींना रुग्णालायत नेईपर्यंत किंवा रुग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतर प्राणास मुकावे लागले आहे. या अपघातांमध्ये रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. यात दोन वर्षांत ३ हजार ३४० जण ठार झाल्याचे रेल्वे पोलीस सांगतात. त्यानंतर धावत्या लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांबरोबरच अन्य अपघातांचा नंबर लागतो. रेल्वे रूळ ओलांडू नये किंवा दरवाजाजवळ लटकू नये, त्याने जिवाला धोका असल्याचे आवाहन रेल्वेकडून वारंवार केले जाते. मात्र या धोक्याच्या सूचनेकडे प्रवाशांकडून दुर्लक्षच केले जाते. त्यामुळेही अपघातांचे प्रमाण वाढले आहे.रुग्णवाहिका आहे, पण...रेल्वे स्थानक व हद्दीत एखाद्या प्रवाशाचा अपघात झाल्यास त्याला तत्काळ उपचार मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी मध्य रेल्वे मेन लाइन, हार्बर आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर प्राथमिक उपचार मिळतील अशी सुविधा देण्यात आली आहे. मात्र त्यातही काही स्थानकांवर त्रुटी असल्याचेच दिसते. अपघातग्रस्त प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी पूर्वी काही मोजक्याच स्थानकांवर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र वेळीच चालक उपलब्ध न होणे, रुग्णवाहिकेत तांत्रिक समस्या उद्भवत असल्याने त्यांच्या सेवा काही स्थानकांवर बंद करून केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत रुग्णवाहिका स्थानकांवर देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पश्चिम आणि मध्य रेल्वेला एकूण ४६ रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या. यात पश्चिम रेल्वेमार्गावर चर्चगेट ते विरारपर्यंत २८ तर मध्य रेल्वेमार्गावर सीएसटी ते मुलुंड स्थानकापर्यंत १८ रुग्णवाहिका आहेत. ठाणे ते रोहा आणि विरार ते डहाणूपर्यंत रुग्णवाहिकाच नसल्याने मोठी समस्या आहे. या रुग्णवाहिकांमध्येही एक डॉक्टर, एक नर्स आणि एक सेवक आणि आॅक्सिजन सिलिंडरही असेल, असे सांगण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात चालकाशिवाय डॉक्टर तसेच नर्स रुग्णवाहिकेत उपलब्ध नसल्याचेही आढळून आले आहे. ‘हेलिपॅडचा’ विसरचरेल्वे अपघातातील जखमींना ट्रॅफिक जाममधून तत्काळ रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेणे शक्य होत नाही. त्यामुळे जखमी प्रवाशाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. रेल्वेकडून यावर कुठला तोडगा काढण्यात आला आहे, याची विचारणा उच्च न्यायालयाकडून नुकतीच करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वेकडून उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. यात मुंबई आणि उपनगरातील १४ जागा हेलिपॅडसाठी निश्चित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. यामध्ये आझाद मैदान, माटुंगा जिमखाना, भायखळा, कुर्ला रेल्वे कॉलनी ग्राउंड, ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडिअम, कल्याण रेल्वे स्कूल, अंबरनाथ एमआयडीसी, बदलापूर आदर्श विद्या मंदिर ग्राउंड, भिवपुरी रोड येथील नंदकुमार इन्स्टिट्यूट, टिटवाळा येथील गणेश मंदिर, लोणावळा, इगतपुरी रेल्वे ग्राउंड, पनवेल, वसईतील वायएमसीए ग्राउंड येथील जागेचा समावेश आहे. यातील प्रथम भायखळातील रेल्वेच्या जागेवर हेलिपॅड करण्याचा निर्णय झाल्यावर त्याची पाहणी हवाई दलाकडून करण्यात आली. मात्र उपस्थित झालेली अनेक तांत्रिक कारणे यामुळे हेलिपॅडचा प्रस्ताव मागे पडत गेला. वर्ष उलटूनही दोन स्थानकांवरच मेडिकल रूममुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे रेल्वे अपघात होतात. त्यामुळे स्थानकांवर वैद्यकीय सुविधा पुरवण्यात याव्यात, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. त्याची अंमलबजावणी पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून केली जात असली तरी त्याला विलंबच होत आहे. एक वर्ष उलटून गेले तरी फक्त दोनच मेडिकल रूम पूर्ण करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, मुंबई सेंट्रल, वांद्रा, अंधेरी, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, वसई रोड, विरार आणि पालघर; तर मध्य रेल्वेवरील कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण, कर्जत, वडाळा, वाशी, पनवेल स्थानकात मेडिकल रूम उभारण्यात येणार होते. यातील फक्त मध्य रेल्वेवरील पनवेल आणि ठाणे स्थानकात मेडिकल रूम उभारण्यात आले आहेत. त्यामुळे अपघात झाल्यास उपचारासाठी रुग्णालयच गाठावे लागणार आहे. लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडून अनेक प्रवाशांना प्राणास मुकावे लागते. प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी यावर तोडगा काढण्याची मागणी केल्यानंतर प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यावर सध्या भर दिला जात आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर २८ स्थानकांमध्ये १४० प्लॅटफॉर्म असून, यातील ५० प्लॅटफॉर्मची उंची ही ८४० मीटर ते ९०० मीटर एवढी आहे. या प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम जोमाने सुरू आहे; त्याचबरोबर मध्य रेल्वेवरील ७६ स्थानकांवर २७३ प्लॅटफॉर्म आहेत. यातील ८३ प्लॅटफॉर्मच्या उंचीचा कळीचा मुद्दा असून, यामध्ये ४३ प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण करण्यात आले आहे; तर उर्वरित ४० प्लॅटफॉर्मचे काम या वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
रेल्वे ‘गोल्डन अवर’ साधणार का?
By admin | Published: January 04, 2016 2:09 AM