विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार - वर्षा गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:08 AM2021-01-20T04:08:20+5:302021-01-20T04:08:20+5:30
वर्षा गायकवाड : स्थलांतरित विद्यार्थ्यांसाठी सेक्शन विभाग राबवणार विशेष मोहीम लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे ...
वर्षा गायकवाड : स्थलांतरित विद्यार्थ्यांसाठी सेक्शन विभाग राबवणार विशेष मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. रोजगार बंद झाला. त्यामुळे अनेक विद्यार्थी हे रोजंदारीच्या कामावर जाऊ लागले. शाळांपासून दूर झाले. शहरामध्ये झोपडपट्टी भागामध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. अनेक जिल्ह्यांमधील विद्यार्थी हे शेतमजुरी, वीटभट्टीवर काम करत आहेत. आता कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असून, शाळाही सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून विशेष उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
लोकसहभागातून विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना पुन्हा शाळेत आणण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिली. कारण यासाठी फक्त शिक्षण विभागातील कर्मचारी, शिक्षकच नव्हे तर स्थानिक लोकप्रतिनिधी, समाजसेवक यांचाही सहभाग घेण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. कोरोनामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. मात्र अनेक विद्यार्थी हे गावाला गेल्यामुळे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले.
या दरम्यान राज्यात किती विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत याचा तपशील गोळा करण्याच्या सूचना जिल्हानिहाय शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हा तपशील आल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत कसे आणता येईल यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, बालरक्षक ग्रामीण भागातील व झोपडपट्टी भागातील घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांची माहिती घेऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली.
..................