Join us

ब्रॉडबँड सेवांना दिलेल्या सवलतींबाबत ट्राय करणार फेरविचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:06 AM

मुंबई : डिजिटल क्षेत्राला गती देण्यासाठी कायमस्वरूपातील ब्रॉडबँड सेवांना अनुज्ञप्ती आणि इतर शुल्कात दिलेल्या सवलतींबाबत फेरविचार करणार असल्याचे दूरसंचार ...

मुंबई : डिजिटल क्षेत्राला गती देण्यासाठी कायमस्वरूपातील ब्रॉडबँड सेवांना अनुज्ञप्ती आणि इतर शुल्कात दिलेल्या सवलतींबाबत फेरविचार करणार असल्याचे दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) म्हटले आहे. संबंधित कंपन्या अशाप्रकारच्या सवलतींचा गैरफायदा घेऊ शकतात, असा आक्षेप केंद्रीय दूरसंचार विभागाने घेतल्यामुळे ट्रायने त्याबाबत फेरविचाराचा निर्णय घेतला आहे.

दूरसंचार क्षेत्रामुळे गेल्या काही वर्षांत आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडले आहेत. काळानुरूप या बदलांची गती आणखी वाढविण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना सवलती देण्याचा निर्णय ट्रायने घेतला. त्यानुसार स्पेक्ट्रम लायसन्स, ऑप्टिकल फायबर नेटवर्क, टॉवर्स, कायमस्वरूपातील ब्रॉडबँड सेवा, केबल टीव्ही, सॅटेलाईट, आयएसपी लायसन्स यांच्या शुल्कात सवलत आणि पायभूत सुविधांच्या वापराची मुभा देण्यात आली. त्याचा कालावधी पाच वर्षे ठरविण्यात आला.

आता केंद्रीय दूरसंचार विभागाने या सवलतींबाबत फेरविचार करण्याची सूचना ट्रायला केली आहे. कायमस्वरूपातील ब्रॉडबँड (फिक्स लाईन) सेवा डिजिटल क्षेत्राच्या वाढीस खरोखरच हातभार लावत आहेत का, ग्राहकांना थेट सुविधा पुरविण्यात त्यांचा कितपत वाटा आहे, याविषयी फेरआढावा घेण्यात यावा. संबंधित कंपन्या सवलतींचा गैरफायदा घेत नाहीत ना, याकडेही लक्ष द्यावे. शिवाय अशाप्रकारे सूट दिल्यास महसुलावरही परिणाम होऊ शकतो याचाही विचार करावा, असे दूरसंचार विभागाने म्हटले आहे.

दरम्यान, ट्रायने याबाबत ३ ते १० जूनपर्यंत भागधारकांकडून सूचना आणि हरकती मागविल्या आहेत. त्याचप्रमाणे ५ जी सेवा सुरू करण्यासंदर्भातही शिफारस करण्यात आली आहे. स्ट्रीट फर्निचरच्या वापराबाबतही सूचना करण्यास सांगण्यात आले आहे.

............

ग्राहकसंख्या किती (आकडेवारी मिलियनमध्ये)

फिक्स लाईन.... वायरलेस..... मोबाईल

२२.२९..... ०.६५.... ७२४.४६