Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा पाय आणखी खोलात! आता शिवसेना भवनही हातातून जाणार? तक्रार दाखल, टेन्शन वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 08:39 PM2023-02-20T20:39:25+5:302023-02-20T20:40:10+5:30
Maharashtra News: शिवसेना भवनाविरोधात एक तक्रार दाखल करण्यात आली असून, यामुळे उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Politics:उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय येणे बाकी असताना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल देत ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले. यानंतर यासंदर्भात राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येत आहेत. यातच शिवसेनेचा फंड, शिवसेना भवन यावरून दावे-प्रतिदावे सुरू असतानाच धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना भवनही जाणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
शिवसेना भवनाविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना भवन आणि शिवाई ट्रस्ट विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे सामाजिक कार्यकर्ते योगेश देशपांडे यांनी तक्रार दाखल केली आहे. शिवाई पब्लिक ट्रस्ट असताना एखाद्या पक्षाला कशी दिली? एकदा राजकीय पक्षाला ट्रस्टची वास्तू का वापरु दिली? अशी विचारणा योगेश देशपांडे यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. सर्वसामान्यांचा असा समज होता की, ही शिवसेनेची जागा आहे. मात्र, यासंदर्भातील गोपनियता बाळासाहेबांनीच ठेवली होती का? याबाबत अधिक माहिती घेतली असता ही जागा शिवाई ट्रस्टची असल्याचे समोर आले, अशी माहिती योगेश देशपांडे यांनी दिली.
पब्लिक ट्रस्ट जागा रेंट आऊट करु शकत नाही
न्यूजमध्ये माहिती मिळाली की, शिवसेना भवनाची जागा ही शिवसेनेची नसून शिवाई ट्रस्टची आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊन तक्रार दाखल केली. कारण पब्लिक ट्रस्ट जागा रेंट आऊट करु शकत नाही. ट्रस्टच्या जागेमध्ये कुठल्याही राजकीय उपक्रम राबवता येत नाही. असे असताना सुद्धा इतक्या वर्षांपासून तिथे राजकीय उपक्रम सुरु आहेत. याबाबतल धर्मादाय आयुक्तांनी काय भूमिका घेतली होती? तसेच याबाबत काय कारवाई करणार? हे विचारण्याकरता नोटीस पाठवली आहे. याशिवाय आपण PIL करणार आहोत, असे योगेश देशपांडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आतापर्यंत हा विषयच समोर आला नव्हता. परवा कोणीतरी दावा केला होता की, बाळासाहेबांनी ही एक सिक्रेट अरेंजमेंट केलेली होती. याबद्दल थोडी माहिती घेतल्यावर लक्षात आले की, अशा अनेक काही जागा घेतलेल्या आहेत का? याची चौकशी व्हावी. म्हणून धर्मादाय आयुक्तांकडे विचारणा केली आहे, असे योगेश देशपांडे म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"