Join us

स्टेशनवरील वडा, समोसाही बंद होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 1:29 AM

मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील स्थानकांवर सरबते विकण्यावर घातलेल्या बंदीपाठोपाठ आता वडा, समोस्यावरही बंदी घालण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हे पदार्थ बनवताना स्वच्छतेची पुरेशी काळजी घेतली जात नाही.

- कुलदीप घायवट ।मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील स्थानकांवर सरबते विकण्यावर घातलेल्या बंदीपाठोपाठ आता वडा, समोस्यावरही बंदी घालण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हे पदार्थ बनवताना स्वच्छतेची पुरेशी काळजी घेतली जात नाही. तसेच वारंवार वापरलेल्या तेलात ते तळले जातात, अशा असंख्य तक्रारी आल्याने अन्न आणि औषध भेसळ प्रतिबंधक विभाग, रेल्वे प्रशासन या पदार्थांवर बंदीचा विचार करीत आहे.स्थानकात भरगर्दीत हे पदार्थ तळले जात असल्याने त्याचा प्रसंगी प्रवाशांच्या जीवाला धोका उद््भवू शकतो, याचा विचार करून सुरक्षेच्या कारणास्तवही पदार्थ तळण्यावर बंदी येऊ शकते, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर स्पष्ट केले.रेल्वे स्थानकांतील खाद्यपदार्थांचा दर्जा खराब असतो. ते तयार केले जाणारे ठिकाण अस्वच्छ असते, हे लक्षात आल्याने या पदार्थांवर बंदीचा विचार सुरू झाला आहे. हार्बर मार्गावर वाशीच्या पुढे आणि ट्रान्सहार्बर मार्गावर कॅन्टीन नसूनही प्रवाशांचे काही अडलेले नाही. उलट फलाटांवर अधिक मोकळी जागा उपलब्ध होते, स्वच्छता राहते हे लक्षात आल्याने लवकरच हा निर्णय प्रत्यक्षात येण्याची चिन्हे आहेत.रेल्वे स्थानकांतील विक्रेते स्वच्छतेचे कोणतेही नियम पाळत नाहीत. कॅन्टीनमध्ये काम करतो, असे कारण देत त्या नावाखाली अनेकांचा स्थानकांत मुक्त वावर असतो. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव कॅन्टीनचा मुद्दा पुढे आणला आहे.यापूर्वी स्थानकांतील वडापाव आणि समोस्यात कीटक आढळल्याच्या घटना समोर आल्या होत्या. लिंबूपाण्यानंतर सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या एका मेसेजमध्ये समोस्यावर पाय ठेवून झोपलेल्या व्यक्तीचा फोटो फिरत होता. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या दर्जाबद्दल प्रवाशांत भीतीचे वातावरण आहे. ते पाहता अशा पदार्थांवर बंदीचा गांभीर्याने विचार प्रशासनाने सुरू केला आहे.तपासणीनंतर सरबतबंदी उठणार?सध्या रेल्वे स्थानकांवर सरबत विक्रीवर बंदी असली, तरी ताज्या फळांचे रस आणि कोल्ड्रिंक पुरवले जात आहे. अर्थात तपासणी करून काही कालावधीनंतर सरबतांवरील बंदी उठवली जाऊ शकते, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.तक्रारी आल्याचे मान्य : मध्य रेल्वे मार्गावरील विविध प्रवासी संघटनांनी रेल्वे स्थानकांवरील स्टॉलची तपासणी केली होती. तेव्हा तेथील अस्वच्छ वातावरण, कोंदट जागा, अपुरी स्वच्छता, बराच काळ चिरून ठेवलेल्या भाज्या, त्यांचा दर्जा, वारंवार एकाच तेलात पदार्थ तळल्याने त्यात वाढणारे विषारी घटक त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा विचार करून त्यावर बंदी घालावी, असे मत संघटनांनी यापूर्वीच मांडले होते. खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत तक्रारी असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केले.

टॅग्स :मुंबई