विलेपार्लेमधील मताधिक्य यंदाही निर्णायक ठरेल?,भाजपाला आघाडी टिकण्याची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 03:35 AM2019-03-27T03:35:25+5:302019-03-27T03:35:38+5:30
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या पूनम महाजन यांना सर्वांत जास्त मताधिक्य मिळाले होते व त्यांच्या खासदार म्हणून कारकिर्दीला प्रारंभ झाला होता.
- खलील गिरकर
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या पूनम महाजन यांना सर्वांत जास्त मताधिक्य मिळाले होते व त्यांच्या खासदार म्हणून कारकिर्दीला प्रारंभ झाला होता. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन आमदार कृष्णा हेगडे यांना तिसऱ्या क्रमांकावर ढकलत शिवसेनेचे शशिकांत पाटकर यांचा तब्बल ३२ हजार ४३५ मतांनी पराभव करीत अॅड. पराग अळवणी यांनी विजय प्राप्त केला. त्यामुळे उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील सर्वांत जास्त मताधिक्य मिळविणाऱ्या या मतदारसंघाकडून भाजपाला या वेळीदेखील तशाच प्रकारच्या अपेक्षा आहेत. तर, काँग्रेससमोर गेल्या निवडणुकीत मिळविलेली मते टिकवण्याचे मोठे आव्हान आहे.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात पराग अळवणी यांना ७४ हजार २७० मते मिळाली होती. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शशिकांत पाटकर यांना ४१ हजार ८३५ मते मिळाली होती. तत्कालीन आमदार कृष्णा हेगडे यांना २४ हजार १९१ मतांवर समाधान मानावे लागले होते. आता हेगडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असल्याने भाजपाची ताकद वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीत विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात एकूण १ लाख ५१ हजार ९८० मतदान झाले होते. त्यामध्ये भाजपाच्या पूनम महाजन यांना १ लाख १० हजार २०१ मते मिळाली होती. तर काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना ३१ हजार २५४ मते मिळाली होती. महाजन यांनी तब्बल ७२ टक्के मते मिळविली होती. त्यामुळे एका अर्थाने त्या वेळी ही निवडणूक एकतर्फी झाली होती. या निवडणुकीच्या माध्यमातून विलेपार्ले हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून समोर आला. त्यामुळे ही ओळख टिकविण्यासाठी भाजपाची नेतेमंडळी कामाला लागली आहेत. कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघातून पुन्हा एकदा महाजन यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार भाजपाने केला आहे.
महाजन यांना मिळालेल्या सुमारे १ लाख ८६ हजारांच्या मताधिक्यामध्ये केवळ विलेपार्ले मतदारसंघात ७८ हजारांचे मताधिक्य मिळाले होते.
या मतदारसंघात आमदारांच्या व नगरसेवकांच्या माध्यमातून नगरसेवक, आमदार व खासदार भाजपाचे असल्याने त्यांचा बोलबाला आहे. दुसरीकडे, काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी पराभवानंतर या मतदारसंघाकडे फारसे लक्ष दिलेले नाही. २०१४च्या निवडणुकीच्या मतदानाचा कल कायम ठेवण्यात भाजपाला यश मिळते की काँग्रेस कमबॅक करण्यात यशस्वी ठरते, यावर एकूण उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची वाटचाल स्पष्ट
होईल.
राजकीय घडामोडी
प्रिया दत्त यांचा २००९ मध्ये विजय होण्यासाठी तत्कालीन आमदार कृष्णा हेगडे यांच्यासहित काँग्रेसचे कार्यकर्ते झटले होते. मात्र, २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर हेगडे यांनी कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसचे पारडे हलके झाले आहे तर भाजपाचे पारडे जड झाले आहे.
विलेपार्ले मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे आमदार अॅड. पराग अळवणी यांच्यावर पूनम महाजन यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची मुख्य जबाबदारी आहे. त्यांच्या पत्नी ज्योती अळवणीदेखील नगरसेविका म्हणून सक्रिय असल्याचा पक्षाला चांगला लाभ होऊ शकतो.
दृष्टिक्षेपात राजकारण
पूनम महाजन यांच्या प्रचाराची धुरा पराग अळवणी यांच्यावर आहे. २०१४ प्रमाणे सहा मतदारसंघांतील सर्वांत जास्त मताधिक्य पुन्हा मिळवून देण्यासाठी अळवणी प्रयत्नशील आहेत. प्रचाराचे सूक्ष्म नियोजन त्यांनी केले असून महाजन यांची उमेदवारी निश्चित असल्याने त्यांना प्रचाराच्या तयारीला चांगला वेळ मिळाला आहे.
काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता असल्याने या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार कोण असेल हीच चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यामुळे निवडणूक जाहीर होईपर्यंत सुस्त असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना चार्ज करून प्रचार करण्याचा व काँग्रेसी विचारधारेची मते टिकवण्याचे आव्हान दत्त यांच्या समोर उभे ठाकले आहे.